Osmanabad : कळंबमध्ये बनावट नोटांचा पर्दाफाश, एकाला अटक

पोलीसनामा ऑनलाइनः कळंब शहरातील 200, 500 रुपयांच्या बनावट नोटांचा पर्दाफाश करण्यात उस्मानाबाद पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी कळंब पोलिसांत गुन्हा दाखल करून एकास अटक केली आहे. याचे मुख्य कनेक्शन लातुरात असून लाखो बनावट नोटा चलनात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बनावट नोटांचे धागेदोरे शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र आता मुख्य आरोपीला पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

असरफअली तायरअली सय्यद (वय 25, रा. बाबानगर कळंब) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कळंब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून कळंब शहरात बनावट नोटांचे रॅकट सुरु होते. 200, 500 रुपयांचा बनावट नोटा चलनात बाजारात फिरू लागले होते. त्यामुळे व्यापारी- ग्राहक एकमेकांना संशयाने पाहत होते. दरम्यान एका व्यापा-याने कळंबचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांना बनावट नोटा बाजारात चलनात आल्याची माहिती दिली होती. त्यानुसार शुक्रवारी मध्यरात्री सापळा रचून पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 500 रुपयांच्या 3 नोटा आणि 200 रुपयांच्या 5 बनावट नोटा मिळाल्या. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता घरात आणखी बनावट नोटा आढळल्या. या प्रकरणी रात्री उशिरा कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.