दुर्दैवी ! कारच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन –   भरधाव कारने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. येरमळा मार्गावरील आंदोरा गावाजवळ शनिवारी (दि. 3) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीवरील पती-पत्नी याना दोनशे फुटापर्यत चारचाकी कारने फरफटत नेले होते. याप्रकरणी कळंब पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुधीर लोमटे (वय-45) आणि त्यांची पत्नी अनिता लोमटे (वय-42 रा.जवळा ता.कळंब) अशी मृतांची नावे आहेत. सुधीर लोमटे हे जवळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते.
याबाबतची माहिती अशी की, सुधीर लोमटे व त्यांची पत्नी अनिता हे दोघेजण कन्हेरवाडी येथे नातेवाईच्या वर्षश्रध्दाच्या कार्यक्रमासाठी दुचाकीवरून येरमळाच्या दिशेने जात होते. येरमळ्याहून भरधाव वेगाने येणा-याने कारने ( एम.एच -14 -एचडी- 0561) आंदोरा गावाजवळील पुलावर दुचाकीला जबर धडक दिली. यात सुधीर व त्यांची पत्नी अनिता लोमटे जागीच ठार झाले. चारचाकी कार महिला चालवित असल्याचे काही प्रत्यक्षर्शीने सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पती-पत्नीवर उपजिल्हा रुग्णलयात शवविच्छेदन करण्यात आले. कळंब पोलीस तपास करत आहेत.