उस्मानाबाद : अंत्यसंस्कारासाठी तब्बल 2 दिवसांची करावे लागते प्रतीक्षा; नातेवाईक, नागरिक झाले हतबल

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना बाधितांचा आकडा जसा वाढताना दिसत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. उस्मानाबाद येथील मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी एक दुर्दैवी वेळ आलीय. मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला २ ते ३ दिवस अवधी लागत आहे. तर सुमारे १३ मृतदेहाचे अंत्यसंस्कार करणे राहिले आहे. यामुळे नातेवाईक आणि नागरिक हतबल झाले आहे. स्मशानभूमीत मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांना अधिक वेळ प्रतिक्षा करावी लागत असल्याचे दिसत आहे.

एखाद्या नातेवाईकाचा सदस्य कोरोनाने मृत्यूमुखी पडला तर त्याचा अंत्यसंस्कार करण्यासाठी खूप वेळ वाट पाहावी लागत आहे. यामध्येच नातेवाईकांची हेळसांड होत आहे. तर यामुळे नगरपालिकेकडून काहीतरी उपाययोजना करण्याची आवश्यकता तेथील लोकांकडून व्यक्त होऊ लागली आहे. विद्युतदाहिनीची सोय केल्यास ही समस्या काही प्रमाणात सुटू शकेल असेही बोललं जात आहे. तर डॉ. इस्माईल मुल्ला म्हणाले, सरकारी रुग्णालय फक्त सकाळीच १२ वाजेपर्यंतचे मृतदेह नगरपालिकेकडे सुपूर्द केले जात होते. त्यानंतर मृत्यू होणाऱ्या मृतदेहाची हेळसांड होत असल्याने आता संध्याकाळी पुन्हा मृतदेह देण्यास सुरुवात केली गेली आहे.

कोरोना विषाणुमुळे मृत्यू झालेल्यांचा मृतदेह तेथील नगरपालिकेकडे सुपूर्द केले जातात. त्यानंतर त्यांच्या कर्मचाऱ्यामार्फत मृताच्या नातेवाईकांच्या उपस्थित त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पाडले जातात. तर सरकारी रुग्णालयाकडून दुपारी १२ पर्यंत जे व्यक्ती मृत्यू झालेले आहेत. त्यांचेच मृतदेह दिले जातात. त्यानंतर मृत्यू झालेल्यांना त्याच्या दुसऱ्या दिवशीच मृतदेह दिला जात असल्याने नातेवाईकांना अधिक वेळ थांबावं लागत आहे. तसेच, नगरसेवक अक्षय ढोबळे म्हणाले, माझ्या प्रभागातील काल १ वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मदतीसाठी स्मशानभूमी मध्ये गेल्यानंतर अतिशय भयावह परिस्थिती बघायला मिळाली. तिथे अंत्यसंस्कार करायला जागा सुद्धा शिल्लक नव्हती. मसनजोगी अंत्यसंस्कार करुन पूर्णपणे थकून आजारी पडल्याचे दिसले. अखेर काही लोकांना घेऊन स्वत: अंत्यसंस्काराची तयारी केली.