Exit Poll 2019 : उस्मानाबादमध्ये शिवसेनेला अंतर्गत गटबाजीचा ‘फटका’ तर राष्ट्रवादीला ‘आधार’ ?

उस्मानाबाद : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे अंदाज वर्तविण्यास चांगलेच उधान आले आहे. उस्मानाबाद लोकसभेच्या जागेवर कोण निवडून येणार यावर देखील चांगलीच चर्चा रंगली आहे.

येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये येथे थेट लढत आहे.राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे दोघंही २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढले होते. त्यावेळी राणा जगजितसिंह यांचा विजय झाला आणि ओमराजे पराभूत झाले होते.

गेल्यावेळेस येथून राष्ट्रवादीचे नेते पदमसिंह पाटील यांचा पराभव करत  शिवसेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड विजयी झाले होते परंतु त्यांना यावेळेस लोकसभेचे तिकीट नाकारण्यात आले. गायकवाड यांना तिकीट नाकारण्यात आल्यामुळे गायकवाड समर्थक असलेले शिवसैनिक चांगलेच नाराज झाल्याचे दिसून आले. गायकवाड यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली.

दरम्यान शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली. त्या क्लिपमध्ये ओमराजे निंबाळकर रवींद्र गायकवाड यांना शिवीगाळ करताना दिसून आले. या व्हिडीओ क्लिपवरून चांगलाच वाद निर्माण झाला. अखेर मतदानाच्या एक दिवस आधी गायकवाड  यांनी उमरगा पोलीस स्थानकात ओमराजेंविरोधात तक्रार दाखल केली. शिवसेनेच्या या अंतर्गत गटबाजीचा परिणाम मतदानावर कितपत होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. शिवाय, येथुन वंचित बहुजन आघाडीकडून धनगर समाजाचे अर्जुन सलगर देखील लढत आहेत. वंचित बहुजन आघाडीला मिळणाऱ्या मतांचा तोटा राणाजगजितसिंह यांना होण्याची शक्यता आहे.

 

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात उस्मानाबाद, तुळजापूर, भूम, वाशी, परांडा, औसा, कळंब, बार्शी, उमरगा, लोहारा या तालुक्यांचा समावेश होतो.यामध्ये उमरगा सोडलं तर बाकीच्या सगळ्या विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेस – राष्ट्रवादीचा दबदबा आहे.  दरवेळेस बार्शी तालुक्यात होणारे मतदान निर्णायक भूमिका बजावते, त्यामुळेच जिकडे बार्शी तिकडे सरशी असे देखील म्हंटले जाते.

पण बार्शी तालुक्यात देखील शिवसेना आणि राष्ट्रवादीला फिफ्टी फिफ्टी मतदान झाल्याचे बोलले जात आहे.  गेल्यावेळेस मोदी लाटेचा फायदा गायकवाड यांना मिळाला होता या वेळेस मात्र नरेंद्र मोदी यांची लाट दिसून येत नाही. त्यामुळे सुरवातीला एकतर्फी वाटणाऱ्या या लढतीत चांगलीच चुरस निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.