उस्मानाबाद ‘कोरोना’च्या संकटात पालकत्व स्विकारलेला जिल्हा वार्‍यावर, पालकमंत्री गडाख यांच्या निषेधार्थ मनसेची पोस्टरबाजी

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना महामारीच्या संकटात जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी असलेले पालकमंत्री शंकरराव गडाख दोन महिन्यांपासून फिरकले नाहीत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवरही कोणाचा अंकुश राहिलेला नाही. या प्रकाराच्या निषेधार्थ बुधवारी ‘पालकमंत्री हरवले आहेत’ अशा आशयाचे पोस्टर शहरात लावून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिक कोरोना संकटाचा मुकाबला करत आहेत. परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे. परंतु जांच्यावर जिल्ह्याची पालकत्वाची जबाबदारी आणि प्रशासकीय यंत्रणा अधिक गतिमान करण्याची जबाबदारी आहे, ते पालकमंत्री शंकरराव गडाख दोन महिन्यापासून जिल्ह्यात फिरकलेच नाहीत. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शहरात विविध ठिकाणी पालकमंत्री हरवले आहेत, जाहीर निषेध, पाहिजेत पालकमंत्री असे पोस्टर लावून निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी जिल्हा मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे, मिंलीद चांडगे, उस्मानाबाद शहराध्यक्ष संजय पवार, सौरभ देशमुख, पृथ्वी शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.