Osmanabad : सरकारकडे शेतकर्‍यांबद्दल संवेदनशीलता दाखविण्याची संधी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची ठाकरे अन् पवारांवर टीका

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –   मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकर्‍यांच्या पीक, शेती, जनावरे आणि सिंचन स्त्रोतांचे मोठे नुकसान झाले आहे. गतवर्षी अतिवृष्टीने नुकसान झाल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी हेक्टरी 25 हजार, 50 हजार रूपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. आता ठाकरे मुख्यमंत्री आहेत, अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना शेतकर्‍यांप्रति संवेदनशीलता दाखवून मदत करण्याची संधी आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृह येथे मंगळवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अतिवृष्टीमुळे शेती क्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. शेतकरी पूर्णतः खचून गेला आहे. त्यांना सावरण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. केवळ पुलावरून पाहणी करून शेतकर्‍यांना तीन-चार हजार रूपयांची तुटपूंज्या मदतीचे धनादेश देण्याचे काम मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यात केले आहे. आम्ही सत्तेत असताना विरोधकांच्या सुरात सूर मिसळून ठाकरे यांनी गतवर्षी हेक्टरी 25 हजार, बागातदारांना 50 हजार रूपये देण्याची मागणी केली होती. अजित पवार यांनी तर एक ते दीड लाखांची मदत करण्याची मागणी करत आमच्यावर टीका केली. यंदा गतवर्षीपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना शेतकर्‍यांप्रति काळजी दाखवून संवेदनशीलतेने भरघोस मदत करण्याची संधी आहे.

यंदाच्या अतिवृष्टीत शेतातील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकर्‍यांसाठी शेती सुधारण्यासाठी, शेतात माती टाकण्यासाठी नवीन योजना अंमलात आणली पाहिजे. जलयुक्त शिवारमधून नद्या, नाल्यांची कामे झाली नसती तर यापेक्षा कितीतरी अधिक पटीने शेतीचे नुकसान झाले असते. जलयुक्तचे सकारात्मक परिणाम येत्या काही महिन्यात दिसतील. मात्र आम्हा विरोधकांचे तोंड दाबण्यासाठी सहा लाख कामांपैकी 700 कामांच्या निव्वळ तक्रारींच्या आधारे चौकशी करावयाची असल्यास ती बिनधास्तपणे करावी. मात्र आता राजकारण करण्याऐवजी नुकसानग्रस्त भागातील घरांसाठी अनुदान, शेतकर्‍यांना आर्थिक मदत करून आधार देणे गरजेचे आहे, असेही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजीमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, औशाचे आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, संघटन सेलचे जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. नितीन भोसले उपस्थित होते. पत्रकार परिषदेनंतर फडणवीस यांनी उस्मानाबाद तालुक्यातील गावसुद, पोहणेर, बेगडा, भंडारी व तुळजापूर तालुक्यातील कात्री, कामठा, अपसिंगा, काक्रंबा येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

पवारांना सरकार वाचवायचे आहे

राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे सरकार आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात राज्य आणि केंद्र सरकार कशाप्रकारे मदत करू शकते, हे शरद पवार यांना चांगले माहिती आहे. केंद्राकडे आपण अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याची मागणी केली आहे. केंद्राचे पथक येवून पाहणी करणार आणि नंतर मदतीची प्रक्रिया; याला वेळ लागणार आहे. तोपर्यंत राज्य सरकारने कशा पध्दतीने मदत करावी हे पवार यांना ज्ञात आहे. मात्र मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्यात शेतकर्‍यांना मदत करण्याची इच्छाशक्ती पाहिजे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

विमा कंपन्यांबाबत निकष बदला

पीकविमा ज्या कंपन्यांमार्फत उतरविला जातो. त्या कंपन्या आणि राज्य सरकारने ठरविलेल्या निकषांमध्ये बदल करणे गरजेचे आहेत. ते बदल झाले नाहीत तर शेतकर्‍यांना अपेक्षित विमा रक्कम मिळत नाही. शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी विमा कंपन्यांवर दबाव आणून निकषांत बदल केले पाहिजेत. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे छायाचित्र ऑनलाइन अर्जासोबत शेतकरी पाठवित आहेत. त्या छायाचित्राआधारेच कंपनीने शेतकर्‍यांना भरपाई दिली पाहिजे, यासाठी राज्य सरकारने विमा कंपन्या आणि सरकारच्या निषकांत बदल करणे गरजेचे आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.