Lockdown : संचारबंदीत उस्मानाबाद जिल्ह्यात पकडली 5 लाखांची दारू

कळंब : पोलिसनामा ऑनलाइन – राज्यात संचारबंदी असताना अवैधरित्या आयशर टेम्पोत भाजीपाल्याच्या कॅरेटमध्ये देशी आणि विदेशी दारूची वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. टेम्पोतून 5 लाखांची दारू जप्त करण्यात आली आहे. मद्यसाठा कोठून आण्यात आला आणि तो कोठे घेऊन जाण्यात येत होता याची चौकशी करण्यात येत आहे.

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मद्य विक्रीसह अत्यावश्यक वस्तू वगळता सर्व व्यवहार ठप्प आहेत. मात्र, या कालावधीत देखील अनेक शहरात छुप्या पद्धतीने गुटखा आणि मद्य विक्री चढ्या दराने विक्री करण्यात येत आहेत. दरम्यान उस्मानाबाद उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला एका आयशर टेम्पोतून भाजीपाला यासाठी लागणाऱ्या कॅरेटमधून मद्य घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला.

बार्शी उस्मानाबाद रोडवर कौडगाव शिवारात बार्शीहून अशियार टेम्पो (एमएच- ०५, के- ९७९६) टेम्पो थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनचालकाने पलायन केले. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. टेंपोची तपासणी केली असता फळ भाजीसाठी वापरण्यात येणाऱ्या कॅरेटमध्ये मद्य लपविल्याचे आढळून आले. बनावट देशी व विदेशी मद्यसाठा, चारचाकी वाहन अशा पाच लाख सात हजार ८२२ रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला. पोलिसांनी बळीराम मनोहर शिंदे (रा. नारेवाडी, ता. बार्शी) यास अटक केली. दुसरा आरोपी सागर बारंगुळे हा फरारी झाला.

उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भरारी पथक एम. एस. गरुड, भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक एस. पी. काळे,जवान सी. डी. कुंठे, डी. व्ही. भराट, एस. के. शेटे, एम. पी. कंकाळ, व्ही. आय. चव्हाण, आर. आर. गिरी, बी. बी. भंडारे, टी. एच. नेर्लेकर, वाहनचालक एजाज शेख यांनी ही कारवाई केली.