उस्मानाबादमध्ये शिवसेनेला ‘धक्का’, ‘बंडखोर’ नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – उस्मानाबादमध्ये शिवसेनेला धक्का बसला असून शिवसेनेचे माजी बंडखोर उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अजित पिंगळे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. अजित पिंगळे हे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. मात्र, प्रामाणिक काम करूनही पक्षात न्याय मिळत नसल्याचा आरोप करत पिंगळे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती.

अजित पिंगळे यांनी गुरुवारी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रतोद आमदार सुरजितसिंह ठाकुर, तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे उपस्थित होते. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंगळे यांच्या हाती भाजपचा झेंडा देऊन त्यांना भाजपमध्ये स्वागत केले.

निवडणुकीनंतर पिंगळे यांनी शिवसेनेत रहावे यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रयत्न केले होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यातच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पुढाकार घेत पिंगळे यांचा भाजप प्रवेश घडवून आणला. पिंगळे यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेना आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांना धक्का बसल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. अजित पिंगळे यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपची उस्मानाबाद कळंब मतदार संघामध्ये ताकद वाढली आहे.