उस्मानाबाद जि.प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवारांची लॉकडाऊनमध्ये पुणे वारी, मिळाली कारणे दाखवा नोटीस

उस्मानाबाद : पोलिसनामा ऑनलाइन – उस्मानाबाद जिल्हा परिषदेत धक्कादायक प्रकार घडला असून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार हे वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन करून पुण्याला जावून आल्याचा घटना समोर आली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा बंदी करण्यात आली आहे. शासकीय कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना अत्यावश्यक असेल तरच परवानगी देण्यात येत आहे. त्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. तर शासकीय कर्मचाऱ्यांना देखील त्यांचे कार्यालय किंवा शहर सोडून जायचे असेल तर परवानगी घ्यावी लागते.

मात्र उस्मानाबाद जिल्हा उप मुख्याधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवून उस्मानाबाद ते पुणे असा प्रवास केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यात कुटुंबाला भेटून परत उस्मानाबाद येथे आले आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेसह जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. सर्व सामान्य नागरिकांना काही केल्या आपल्या गावी जात येत नसताना मात्र अधिकारी पदाचा दुरुपयोग करून गेल्याचे दिसत आहे.

पवार हे उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. उस्मानाबाद येथील बँक कॉलनीत राहतात. त्यांचे कुटुंब पुण्यात असते. ते कुटुंबाला भेटण्यास १७ एप्रिलला पुण्याला गेले होते. २० एप्रिल (सोमवारी) रोजी पहाटे उस्मानाबादेत परत आले. त्यांच्याकडे प्रशासनाचा अधिकृत पास नाही. पदाचा दुरुपयोग करून ते पुण्याला शासकीय वाहनाने जावून आल्याची तक्रार स्थानिक नगरसेवकाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.

यापूर्वीही ते दोन वेळा पुण्याला जावून आल्याचे या नगरसेवकाचे म्हणणे असून याच प्रकरणा मुळे जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांनी पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तर 24 तासात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान पवार यांना पुणेवारी करून आल्या मुळे होम कॉर्नटाईन करण्यात आले आहे. आता प्रशासन त्यांच्यावर नेमकी काय कारवाई करते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.