Afghanistan Bomb Blast: अफगाणिस्तानच्या कारागृहावर कारबॉम्ब हल्ला, 29 जणांचा मृत्यू तर 50 जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्व अफगाणिस्तानातील कारागृहात आत्मघाती कार बॉम्बस्फोट आणि बंदूकधार्‍यांनी हल्ला केला. या हल्ल्यात २९ जण ठार झाले आहेत आणि ५० जण जखमी झाल्याचे अफगाण अधिकाऱ्यांनी सांगितले. या हल्ल्याची जबाबदारी आयएस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. प्रांताचे राज्यपाल अताउल्ला खोगयानी म्हणाले की, जलालाबादमध्ये अफगाण सुरक्षा दले आणि अतिरेक्यांमध्ये भयंकर चकमक झाली. नगरहारच्या राजधानीत रविवारी सायंकाळपर्यंत दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता.

नगरहारच्या गव्हर्नरचे प्रवक्ता अताउल्ला खोगयानी म्हणाले की, या हल्ल्यात २९ लोक ठार झाले आहेत आणि ५० जण जखमी झाले आहेत. पूर्व अफगाणिस्तानमध्ये तालिबान आणि आयएसचे दहशतवादी सक्रिय आहेत.

आयएस खुरासनचा गुप्तचर प्रमुख मारला गेला
दहशतवादाविरूद्ध युद्धात अफगाण सुरक्षा दलाने मोठे यश संपादन केले आहे. अफगाण सैन्याने लष्करी कारवाईत दहशतवादी संघटना आयएस (इस्लामिक स्टेट) च्या खुरासन शाखेचा गुप्तचर प्रमुख असदुल्ला ओरकझईला ठार मारले आहे. पाकिस्तानी वंशाचा हा दहशतवादी काबूलमधील गुरुद्वारावरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले जात आहे.

अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयाने (एनडीएस) म्हटले की, जलालाबाद शहराजवळ सैन्य कारवाईत त्याला ठार केले आहे. असदुल्लाच्या नेतृत्वात आयएसने अफगाणिस्तानमध्ये अनेक मोठे दहशतवादी हल्ले केले होते. यावर्षी २५ मार्च रोजी काबूलमधील गुरुद्वारावर हल्ला देखील त्याच्याच आदेशानुसार झाला होता. या हल्ल्यात २५ शीख भक्त ठार झाले होते.

असदुल्ला पाकिस्तानी नागरिक होता. तो खैबर पख्तूनख्वा प्रांतामधील ओरकझई भागातील रहिवासी होता. त्याचे खरे नाव झियाउर रहमान होते. असदुल्लाच्या सांगण्यावरून दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांव्यतिरिक्त सामान्य नागरिकांवरही हल्ले केले होते. यावर्षी एप्रिलमध्ये आयएस खुरासनचा प्रमुख अस्लम फारुकी पकडला गेला होता. जिया-उल-हक या संघटनेचा एक प्रमुख कमांडरलाही मे महिन्यात अटक करण्यात आली होती.