Coronavirus : ज्येष्ठांना संसर्गाने मृत्यूचा धोका जास्त, पण इराणमध्ये 107 वर्षांच्या आजीनं ‘कोरोना’ला हरवलं

लंडन : वृत्तसंस्था – ज्येष्ठांमध्ये कोरोना संसर्गामुळे मृत्यूचा धोका जास्त आहे, परंतु त्यांचे बरे होण्याचे असे काही प्रकार समोर येत आहेत, जे आश्चर्यचकीत करणारे आहेत. असाच एक प्रकार इराणमध्ये घडला आहे. येथे 107 वर्षांच्या एका आजींनी कोरोनाशी दोन होत केले. रॉयटरच्या वृत्तानुसार, 107 वर्षांच्या सल्तनत अकबरी या आजींना अराक शहरातील खानसारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु, काही काळ आयसोलेशनमध्ये घालवल्यावर त्या ठिक झाल्या, ज्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले.

सल्तनत अकबरी यांचे कोरोनातून बरे होणे ही सकारात्मक आणि दिलासादायक बातमी आहे. यापूर्वी इराणच्याच एका 103 वर्षांच्या महिलेने कोरोनाशी यशस्वी लढा दिला आहे. राजधानी तेहरानपासून 180 किलोमीटर दूर सेमनान हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या या महिलेचे नाव जाहिर करण्यात आले नव्हते. एएफपी वृत्तसंस्थेनुसार, देशाचा दक्षिण-पूर्व भाग केरमानमध्ये सुद्धा एक 91 वर्षांचा वृद्ध कोरोनातून बरा झाला आहे. एवढेच नव्हे तर, या वृद्धाला हाय ब्लडप्रेशर आणि अस्थमाचा त्रासदेखील होता.

रिपोर्टनुसार, या ज्येष्ठ नागरिकांना हॉस्पिटलमध्ये कोणती औषधे देण्यात आली हे मात्र इराणच्या डॉक्टरांनी सांगितले नाही. नुकतेच भारतात सुद्धा इंदौर शहरात एका 95 वर्षांच्या आजींनी कोरोनावर मात केली आहे. ब्रिटिश संशोधकांना एका संशोधनात आढळले की, कोरोना संसर्गाने होणारे सर्वात जास्त मृत्यू हे जास्त वय, पुरूष असणे आणि आधीपासून मधुमेह, श्वसन आणि फुफ्फुसासंबंधी गंभीर आजार असणे, या प्रमुख कारणांमुळे होतात. बीएमजेमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे प्रौढ, पुरूष, लठ्ठपणा, हृदयरोग, फुफ्फुस, लीव्हर आणि किडनीसंबंधी आजाराने त्रस्त लोकांना कोरोना संसर्गाने मृत्यू होण्याचा जास्त धोका आहे. ब्रिटनच्या लिवरपूल विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी इंग्लंडच्या हॉस्पिटलमध्ये दाखल कोरोना रूग्णांच्या आकड्यांचे विश्लेषण करून हा निष्कर्ष काढला आहे. अभ्यासात 43 हजारपेक्षा जास्त रूग्णांना सहभागी करून घेतले होते. शास्त्रज्ञांनुसार 6 फेबुवारीपासून 19 एप्रिलच्या दरम्यान इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंडच्या 208 हॉस्पिटलमध्ये दाखल 20,133 रूग्णांवर हा अभ्यास करण्यात आला.