‘या’ मायक्रोबायोलॉजिस्टला देण्यात आली ‘कोरोना’पासून संरक्षणाची प्रथम ‘लस’, पहिल्या टप्प्यात 800 जणांची ‘निवड’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   यूकेच्या एका मायक्रोबायोलॉजिस्टच्या नावाची इतिहासात नोंद झाली आहे. या शास्त्रज्ञास कोविड -19 या लसीच्या मानवी चाचणी टप्प्यात प्रथम लसीकरण करण्यात आले आहे. ही लस यूकेच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. या लसीच्या मानवी चाचणीसाठी पहिल्या टप्प्यात आठशे जणांची निवड करण्यात आली असून त्यापैकी एलिसा ग्रॅनाटो यांना ही लस प्रथम दिली गेली आहे.

संपूर्ण जगाचे या लसीकडे लक्ष लागून आहे, ही लस धोकादायक कोरोना विषाणूपासून बचाव करणारी एक मोठी उपलब्धी मानली जाते. ही लस शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करेल, जी कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यास मदत करेल. ऑक्सफोर्ड विद्यापीठात या लसीची मानवी चाचणी या आठवड्यात सुरू झाली आहे. लसीकरणानंतर एका वृत्तसंस्थेशी बोलताना ग्रॅनाटो म्हणाल्या, ‘मी एक वैज्ञानिक आहे, म्हणून मी जिथेही होते तिथे वैज्ञानिक प्रक्रियेस पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला.’

ग्रॅनाटो पुढे म्हणाल्या, ‘मी विषाणूच्या बाबतीत अभ्यास केला नसल्यामुळे, मी आजकाल स्वत:ला निरुपयोगी समजत होते, म्हणूनच मला वाटले की या कार्यास पाठिंबा देण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.’ गुरुवारी त्यांच्या 32 व्या वाढदिवशी ग्रॅनाटोला ही लस मिळाली हा एक योगायोग होता.

ग्रॅनाटोच्या कर्करोगावर संशोधन करणार्‍या एडवर्ड ओनील यांनाही लसीकरण करण्यात आले. या दोन्ही स्वयंसेवकांची प्रथम मानवी चाचणी टप्प्यात लसीकरणासाठी निवड झाली. त्यापैकी एकाला कोविड -19 पासून संरक्षणासाठीचे लसीकरण करण्यात आले आणि दुसऱ्याला मेंदूच्या तापाविरूद्ध बचावासाठीची लस दिली गेली होती.

या दोन्ही लसींचा परिणाम तपासण्यासाठी आता 48 तासांपर्यंत त्यांच्यावर लक्ष ठेवले जाईल. या दोघांवर या लसीच्या प्रभावाचा अभ्यास केल्यानंतर, शास्त्रज्ञ टप्प्याटप्प्याने इतर स्वयंसेवकांना लसी देतील. मानवी चाचणी टप्प्यासाठी 18 ते 55 वर्ष वयोगटातील निरोगी लोकांची निवड केली गेली आहे. यापैकी निम्म्या लोकांची तपासणी दोन्ही लसींवर केली जाईल. परंतु यापैकी कोणासही सांगण्यात येणार नाही की त्यांना कोणती लस देण्यात आली आहे.

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या जेनर इन्स्टिट्यूटमधील लसीविज्ञानचे प्राध्यापक आणि लसीवर संशोधन करणार्‍या टीमच्या आघाडीच्या प्रोफेसर सारा गिलबर्ट म्हणाल्या, ‘वैयक्तिकरित्या त्यांना या लसीबद्दल पूर्ण आत्मविश्वास आहे. नक्कीच, आपल्याला मनुष्यांमध्ये याची चाचणी घ्यायची आहे आणि डेटा संकलित करायचा आहे. त्याचा व्यापक वापर होण्यापूर्वी हे दाखवून द्यायचे आहे की ते प्रत्यक्षात कार्य करते आणि कोरोना विषाणूच्या संसर्गापासून लोकांना संरक्षण देते.’ ते परिणामाबाबत खूप आशावादी आहेत.