आरटीईतील विद्यार्थ्यांप्रमाणे इतर विद्यार्थ्यांनाही शुल्कामध्ये सवलत द्यावी – सावित्री सन्मान फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सोनल कोद्रे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागिल वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातल्याने शाळा बंद असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू केली आहे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. सर्वांना समान शिक्षण हक्क दिला आहे. मात्र, कोरोना महामारीमध्ये आरटीईमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 टक्क्यांहून अधिक शुल्क माफी दिली जात आहे. मात्र, इतर पालकांना त्या सवलत का दिली जात नाही, असा सवाल सावित्री सन्मान फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सोनल कोद्रे यांनी उपस्थित केला आहे.

कोद्रे म्हणाल्या की, शासनाकडे आरटीईच्या 25% विद्यार्थ्यांसाठी शासन नियमाप्रमाणे १७ हजार ६१७ रुपये प्रति विद्यार्थी कमी करून केवळ आठ हजार प्रति वर्षी प्रति विद्यार्थी केली आहे. शासन शंभर टक्के शुल्क भरण्यासाठी सक्षम नाही. कोरोना महामारीमध्ये अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, उद्योग-व्यवसाय बंद आहेत, ही सर्व मंडळी आर्थिक संकटात सापडली आहेत. त्यामुळे त्यांनाही शासनाच्या नियमाप्रमाणे आर्थिक सवलत मिळाली पाहिजे. शाळांची शुल्क सर्वांसाठी सारखीच असली पाहिजे, पालकांची परिस्थिती समजून घेऊन शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे शिक्षण मंत्री, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक व उपसंचालक यांच्याकडे केली आहे.