‘कोरोना’मुळे अंतरराष्ट्रीय वाहतूक अनिश्चित काळासाठी रोखता येणार नाही !

जिनिव्हा : वृत्त संस्था – अंतरराष्ट्रीय वाहतूक अनिश्चित काळासाठी रोखणे योग्य ठरणार नाही. यासाठी सरकारांनी कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी आपल्या सीमांच्या आत अन्य पर्यायी उपाय शोधावेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे.

कोरोना संसर्ग वाढल्याने अनेक देशांनी पुन्हा प्रवासावर प्रतिबंध लावण्यास सुरूवात केली आहे. ब्रिटनने युरोपहून येणार्‍या लोकांसाठी ठराविक काळासाठी क्वारंटाइन अनिवार्य केले आहे. यावर यूरोपच्या पर्यटन उद्योगाने चिंता व्यक्त केली आहे. डब्ल्यूएचओने यावरच ही प्रतिक्रिया दिली आहे.

मास्क, शारीरीक अंतर आणि आहारतील सतर्कता आवश्यक
डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अढानम गेब्रेसस यांनी म्हटले की, फेस मास्क घालून, आपसात अंतर ठेवून आणि आहाराच्या पद्धतीत सुधारणा करून कोरोना व्हायरसपासून बचाव करता येईल. जेथे याचे पालन करण्यात आले तेथे संसर्ग कमी झाला आणि रूग्ण बरे सुद्धा होऊ लागले.

जेथे याचे पालन झाले नाही, तेथे संसर्ग वाढत गेला. टेड्रोस यांनी कॅनडा, चीन, जर्मनी आणि दक्षिण कोरियाच्या महामारी नियंत्रणाच्या प्रयत्नांचे कौतूक केले. महासंचालकांनी कोविड-19 ला मागील शंभर वर्षातील सर्वात घातक महामारी घोषित केले. त्यांनी म्हटले, सतर्कता बाळगली नाही तर 16 लाखांपेक्षा जास्त लोकांचा जीव जाऊ शकतो.

स्पेनमध्ये स्थिती आता नियंत्रणात
डब्ल्यूएचओचे आपत्ती कार्यक्रमाचे प्रमुख माइक रेयान यांनी म्हटले, देशाने मोठ्या कालावधीसाठी आपल्या सीमा बंद ठेवणे, हे अशक्य आहे. कोणत्या एका देशासाठी हे शक्य नाही. अर्थव्यवस्था गतिमान ठेवण्यासाठी वाहतूक सुरू ठेवावीच लागेल. लोकांना काम करावे लागेल, व्यापार सुरू करावे लागतील. याच्या सोबतच व्हायरसला तोंड देण्याच्या पद्धतीसुद्धा आपल्याला पाळाव्या लागतील. यामुळे आपली ताकद वाढेल आणि व्हायरसचा संसर्ग कमी होईल.

स्पेनचे उदाहरण देत रेयान म्हणाले, संसर्गामुळे तिथे काही दिवसांपूर्वी स्थिती अतिशय वाईट होती. परंतु, आता स्थिती नियंत्रणात आहे आणि स्थिती सुधारली आहे. जसजसे आपण आजाराला समजून घेऊन, तसतसा आजार कमी होत जाईल. काही आठवड्यानंतर बहुतेक कोविड-19 सुद्धा इतर आजारांसारखा एक होऊन जाईल.