वुहान मार्केटमधून कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचा WHO चा अंदाज , म्हटले – ‘पुष्टी करण्यासाठी अधिक तपासणी आवश्यक’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : गेल्यावर्षी कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात कहर माजवला होता. याची सुरुवात चीनमध्ये झाली होती. या दरम्यान चीनमधील कोरोना स्त्रोताबद्दल जाणून घेण्यासाठी गेलेल्या डब्ल्यूएचओ वैज्ञानिकांच्या पथकाने असा अंदाज वर्तविला आहे कि, वूहान मार्केटमध्ये विकल्या गेलेल्या ससा आणि बिज्जू सारख्या प्रजातींच्या प्राण्यांमधूनच कोरोना विषाणू मानवांमध्ये आला. या तपासणीत सहभागी असलेल्या पथकाने म्हटले की याची स्पष्टपणे पुष्टी करण्यासाठी वुहान मार्केटमधील या प्राणी आणि इतर प्राण्यांच्या पुरवठा करणाऱ्यांची चौकशी होणे आवश्यक आहे. कायदेशीर किंवा बेकायदेशीर विकलेल्या प्रत्येक प्राण्यांची यादी असणे महत्वाचे आहे.

डब्ल्यूएचओच्या टीमने चार आठवड्यांपासून चीनच्या वुहानमध्ये राहिल्यानंतर आपला तपास पूर्ण केला आहे, परंतु सर्व प्रश्नांची उत्तरे येणे बाकी आहे. या पथकाने सांगितले की, कोणत्याही प्रयोगशाळेत कोरोना विषाणूचा पुरावा मिळालेला नाही. वुहान मार्केटची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. दरम्यान, डब्ल्यूएचओ टीमला हव्या असलेल्या माहितीकडे चीनने पूर्णपणे दुर्लक्ष केले. म्हणूनच शास्त्रज्ञांच्या टीमला उपलब्ध डेटावरच तपासणी करावी लागली.

वुहान नंतर आता अमेरिकेतही व्हावी चौकशी : चीन
वुहानमधील कोरोना स्त्रोताच्या तपासणीनंतर आता डब्ल्यूएचओने अमेरिकेतही अशीच चौकशी करावी अशी मागणी चीनने केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले की, तपासात सहकार्य करून आपण ज्या पद्धतीने उदाहरण ठेवले आहे, अमेरिकेनेही तेच केले पाहिजे.