‘नही तो मै 20 फरवरी 2021 से ‘चित्रकुट’ या ‘मंत्रालय’ या ‘आजाद मैदान’ आमरण अनशन पर बैठुंगी, ‘ – करूणा धनंजय मुंडे 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा मुंडे यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना आज (बुधवार) लेखी तक्रार दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. करुणा यांनी आपल्या वकिलासोबत जाऊन पोलीस आयुक्तालयात पती धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच मुलांना भेटण्यास दिले नाही तर 20 फेब्रुवारीला आमरण उपोषण करण्याचा इशारा करुणा यांनी दिला आहे.

करुणा मुंडे यांनी आयुक्तांकडे केलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, माझ्या नवऱ्याविरोधात भांदवि कलम 376, 377,420,471,324,526(2), घरगुती हिंसाचार कायदा कलम 18,19 आणि आयटी अ‍ॅक्ट दाम्पत्य अधिकार कलम 9 अन्वये तक्रार केली आहे. तसेच तक्रारीत करुणा यांनी म्हटले की, माझ्या दोन मुलांना धनंजय मुंडे यांनी गेल्या तीन महिन्यापासून आपल्या बंगल्यात डंबून ठेवले आहे आणि त्यांना भेटू दिले जात नाही. इतकेच नाही तर फोनवर देखील बोलू दिले जात नाही. 24 जानेवारीला चित्रकूट बंगल्यावर मुलांना भेटायला गेले तर धनंजय मुंडे यांनी 30 ते 40 पोलीस बोलावले आणि मुलांना भेटण्यास मज्जाव केला.

तसेच धनंजय मुंडे यांना विधानसभेच्या मंत्रिपदावरुन हटवा. धनंजय मुंडे यांच्या चित्रकूट बंगल्यावर माझी मुलं सुरक्षित नाहीत. कारण माझी लहान मुलगी 14 वर्षाची आहे आणि बंगल्यावर कोणीही काळजी घेणारं नाही, तसेच मुंडे यांचे चाल चलन ठीक नाही. मुंडे लफडेबाज असून दारु पितात. माझ्या विरोधात मुलांना भडकवतात. त्यामुळे माझ्या मुलांना काहीही झालं तर त्याला धनंजय मुंडे जबाबदार असतील आणि मला माझ्या मुलांना भेटू द्यावे. नाहीतर मी 20 फेब्रुवारीला आमरण उपोषणाला बसणार आहे. मला चित्रकूट बंगल्यासमोर वा मंत्रालयासमोर किंवा आझाद मैदानावर आमरण उपोषणासाठी परवानगी दिली जावी. तसेच मुंडे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जावी, असे तक्रारीत म्हटले आहे.