…अन्यथा उपमहापौरांना पालिकेत पाऊल ठेवू देणार नाही, पिंपरी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – शेतकऱ्यांच्या आंदोलनाला चीन, पाकिस्तानातून रसद येत आहे, असे वादग्रस्त विधान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे (Municipal Corporation) उपमहापौर (Deputy Mayor) केशव घोळवे (keshav Gholve) यानी केले होते. त्यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP) वतीने निषेध केला आहे. माफी मागा नाहीतर महापालिकेत पाय ठेऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे.

राष्ट्रवादी युवकचे प्रमुख पदाधिकारी दुपारी उपमहापौर केशव घोळवे यांच्या दालनात दाखल झाले. घोळवे यांनी मंगळवारी सर्व साधारण सभेत शेतकऱ्यांचा अवमान करणारे वक्तव्य केले होते. त्याचा निषेध करण्यासाठी आणि घोळवे यांनी देशातील शेतकऱ्यांची माफी मागावी यासाठी ठिय्या आंदोलन केले. उपमहापौरांना फळे द्यायची होती, मात्र उपमहापौर अॅन्टींचेंबरमधून बाहेर आले नाहीत. त्यामुळे भाजपचे तुषार कामठे यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खुर्चीला पालेभाज्या व फळांचा हार घालून उपमहापौरांचा निषेध केला. उपमहापौरांनी माफी मागावी, अन्यथा, महापालिकेत उपमहापौरांना पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा दिला.

यावेळी विरोधी पक्षनेता राजू मिसाळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, नगरसेवक मयूर कलाटे, पंकज भालेकर, राष्ट्रवादी युवक शहर उपाध्यक्ष प्रसाद कोलते, निखिल दळवी, पिंपरी विधानसभा अध्यक्ष शेखर काटे, सनी डहाळे, अक्षय माचरे, अशोक भडकुंबे, मनजितसिंह कोहली, सोनू बोदडे, प्रतिक साळुंखे आदी उपस्थित होते.