…अन्यथा नीरा गांव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले जाईल : तहसीलदार रूपाली सरनोबत

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन  –   नीरा गावात कोरोना पाँझिटिव्ह रूग्णांची संख्या ५५ झाली असून या मध्ये व्यापा-यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथून पुढे दुकानांंसमोर गर्दी झालेली आढळल्यास, विना मास्क व थुंकताना आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.यातूनही येत्या दोन दिवसांत सुधारणा न झाल्यास अन्यथा नीरा गांव कंटेन्मेंट झोन घोषित केला जाईल असा इशारा पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी नीरा येथे दिला.

नीरा गावांत आठवड्याभरात कोरोणा रूग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने चिंंताजनक परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभुमीवर नीरा ग्रामपंचायतीत शुक्रवारी ( दि.४) ग्रामस्थ , व्यापारी यांची तातडीची बैठक तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी घेतली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना, व्यापा-यांना सुचना दिल्या. यावेळी पुरंदर पंचायत समितीचे उपसभापती प्रा.डॉ. गोरखनाथ माने, गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, जेजुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, नीरा ग्रामपंचायतीचे प्रशासक एन.डी. गायकवाड, विस्तार अधिकारी सतिश कुंभार, मंडलाधिकारी संदीप चव्हाण, ग्रामसेवक मनोज डेरे, तलाठी बजरंग आसवले, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर, वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी घाटगे यांसह ग्रामस्थ, व्यापारी उपस्थित होते.
तहसीलदार रुपाली सरनोबत म्हणाल्या की, नीरा गावात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये व्यापा-यांचे प्रमाण जास्त आहे. ही चिंताजनक परिस्थिती असल्यामुळे नागरिकांना जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच नीरा गावात कंटेन्मेंट झोनचे नियम व्यवस्थित पाळले जात नाही व कंटेन्मेंट झोनचे बोर्ड काढले जात असल्याचे निदर्शनास आले असून येथून पुढे कंटेन्मेंट झोनमध्ये बँरेकेडस् केले जाईल ते जर नागरिकांनी काढले तर त्यांच्यावर पोलिसांमार्फत कारवाई केली जाणार आहे.

नीरा बाजारपेठेमध्ये नागरिक जादा प्रमाणात गर्दी करताना दिसत आहे. येत्या दोन दिवसांत गर्दीचे प्रमाण कमी झाले नाही तर अशा नागरिकांवर पोलिसांमार्फत दंडात्मक व अजामिनपात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे. तरीही नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली तर अन्यथा नीरा गांव बंद ठेवण्याकरिता संपुर्ण नीरा गांव कंटेन्मेंट झोन घोषित केला जाईल असा स्पष्ट इशारा देऊन जेष्ठ नागरिकांनी स्वत:ची काळजी घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरू नये अथवा गर्दी करू नये असे आवाहनही तहसीलदार सरनोबत यांनी केले.
यावेळी गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे , डाँ.अश्विनी घाटगे यांनी नीरा गावांत कोरोणासह डेंग्यू, मलेरिया, चिकणगुण्या या संसर्गजन्य रोगाविषयी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले.