…अन्यथा लोकांचा ठाकरे नावावरील विश्वास उडेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेला परतीचा पाऊस आणि वदळी अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात दाणादाण उडाली. बुधवारी झालेल्या ढगफुटीने राज्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुरात चारजण वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर सोलापूरात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. पावसाचे पाणी अनेकांच्या घरात आणि दुकानात शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेक भागातील शेती पाण्याखाली गेली आहे. सोशल मीडियातून शेतकऱ्यांच्या आक्रोशाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ शेअर करत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.

राज्यात कोसळत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वायूसेना, नौदल, लष्कर यांना तातडीच्या मदतीसाठी हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनुष्यहानी टाळण्यासाठी त्यांनी या सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असले तरी मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडण्याची गरज असल्याचे मत मनसे नते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले आहे. बाळा नांदगावकर यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश पहायला मिळत आहे. परतीच्या पावसाने या शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतात माती ऐवजी पाणी दिसत आहे. या शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.

मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल ‘Online’ बघता येणार नाही, थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरीत आर्थिक मदत द्या. अन्यथा लोकांचा ‘ठाकरे’ नावावरील विश्वास उडेल, अशी फेसबुक पोस्ट करत बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.