सलमानच्या ‘दबंग 3’ ला Full Stop ? ASI ने पाठवली नोटीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाईजान सलमान खानचा आगामी चित्रपट दबंग ३ हा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसत आहे. सध्या या चित्रपटाची मध्य प्रदेशात शुटींग सुरु होती. परंतु भारतीय पुरातन सर्वेक्षण विभागाकडून सलमानला नोटीस पाठवण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील मांडू येथील जल महलात उभारण्यात आलेले सेट हे एएसआयने काढून टाकण्यासाठी सांगितले आहे. जर हे सेट काढले नाही तर शुटींग रद्द केले जाईल अशी तंबीच या नोटीसद्वारे देण्यात आली आहे.

जल महलात सेट उभे करून चित्रपटाच्या टीमने प्राचीन स्मारक, पुरातन स्थळ आणि अवशेष कायदा १९५९ च्या नियमाचे उल्लंघन केले आहे. प्रॉडक्शन हाऊसला याआधीही सावध करण्यात आले होते. परंतु चित्रपटाच्या टीमने मात्र कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, शुटींगवेळी दबंग ३ च्या टीमने नर्मदा नदी जवळ असणाऱ्या एका मुर्तीला नुकसान पोहोचवले आहे. मध्य प्रदेशातील सांस्कृतिक मंत्री विजयलक्ष्मी साधो यांनी यावर भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, “जे काही झालं आहे ते अत्यंत वाईट झालं आहे. मी स्वत: जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहे. जर त्यांनी शुटींग कालावधीत काही हानी केली असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.”

नर्मदा नदीच्या घाटावर शुटींग करून दबंग ३ च्या शुटींगला सुरुवात करण्यात आली. अभिनेत्री करीना कपूर खान देखील या चित्रपटात दिसणार आहे. दबंग ३ च्या आयटम साँगवर करीना थिरकताना दिसणार आहे. अभिनेका बॉबी देओलसुद्धा सलमानच्या मित्राच्या भूमिकेत या चित्रपटात दिसणार आहे. प्रभुदेवा हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. यावर्षी डिसेंबर महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.