प्रविण दरेकरांचे मंत्री नवाब मलिकांना प्रत्युत्तर, म्हणाले- ‘…अन्यथा कोकणवासीय कोल्हापुरी चप्पल हातात घेऊन तुमचे स्वागत करतील’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हाच्या दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान त्यांचा हा दौरा सुटा-बुटातील दौरा असल्याचे म्हणत फडणवीस अन् दरेकर यांनी वापरलेल्या बुटाबद्दल टिप्पणी करणाऱ्या अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना प्रविण दरेकरांनी प्रत्युत्तर दिले आहे. विरोधी पक्ष नेत्यांच्या बुटांकडे लक्ष देण्यापेक्षा नुकसानग्रस्त कोकणवासीयांना मदत करा, अन्यथा, पुमा, नायकी बाजूला राहील. कोकणवासीय कोल्हापुरी चप्पल’ हातात घेऊन नवाब भाईंचे स्वागत करतील असे विधान दरेकर यांनी ट्विटद्वारे केले आहे.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या दौऱ्यात फडणवीस आणि दरेकर दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांचे एकसारखेच बूट होते. आता दौऱ्यासाठी ते बूट खरेदी करत आहेत, मग ते दौऱ्यावर जात आहेत. त्यांना मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यावर प्रश्न निर्माण करण्याचा अधिकार नाही. आपण फोटो पाहिला तर दोन्ही विरोधी पक्षनेते हे एकसारखेच नवीन बूट घालून दौऱ्यावर होते, असे मलिक यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले होते. त्याला दरेकरांनी प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांचा नुकसानीची पाहणी करण्यासाठीचा दौरा केवळ दर्शनाचा कार्यक्रम असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल केला आहे. विरोधी पक्षनेते 3 दिवस, मुख्यमंत्री 3 तास. विरोधी पक्षनेते कोकणवासीयांच्या बांधावर जाऊन विचारपूस, मुख्यमंत्र्यांचा केवळ दर्शनाचा कार्यक्रम, असे दरेकरांनी ट्विट केले होते.