‘…नाहीतर ’मातोश्री’च्या दारात आंदोलन करू !’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाउनमुळे मागील पाच महिन्यांपासून साऊंड सिस्टिम आणि लाईट मालकांसह कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने साऊंड व लाईट मालकांसाठी आर्थिक पॅकेज द्यावे, कर्ज माफ करावे, डिजे वाजवण्यास नियमात परवानगी द्यावी, अशी मागणी डिजे मालकांनी केली आहे. मागण्यांची दखल न घेतल्यास महाराष्ट्रात जनआंदोलन पुकारुन रस्त्यावर उतरू, मातोश्रीच्या अंगणात आंदोलन करण्याचा इशाराही छावा क्रांतिवीर सेना व साऊंड सिस्टिम आणि लाईट असोसिएशनने दिला आहे.

महाराष्ट्र राज्य छावा क्रांतिवीर संघटना व पुणे जिल्हा साउंड सिस्टिम आणि लाईट असोसिएशनच्या जुन्नर व आंबेगाव तालुका कमिटीचा मेळावा आंबेगाव तालुक्यातील एकलहरे इथे काल पार पडला. यावेळी अध्यक्ष करण गायकर, केंद्रिय अध्यक्ष प्रतापसिंह कांचन पाटील उपस्थित होते. ’साऊंड सिस्टिम व लाईट असोसिएशनच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा मुंबईत ’मातोश्री’च्या दारात आंदोलन करू. मागण्या मान्य करणे शक्य नसेल तर सरकारने साऊंड मालकांचे साहित्य विकत घेऊन कर्ज माफ करावे’ असा इशारा संघटनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी सरकारला दिला. यावेळी साऊड सिस्टिम व लाईट असोसिएशनकडून तहसिलदार जुन्नर, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर, पोलीस स्टेशन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिल्याची माहिती जिल्हाध्यक्ष गणेश काळभोर यांनी दिली.