‘फेसबुक-ट्विटर’ असो की नेटफ्लिक्स-Amazon, सर्वांसाठीच बनवली गेली कठोर नियमावली; न्यूज पोर्टलसाठी नियमावली तयार, 3 स्तरावरून असणार ‘लक्ष’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –   जर तुम्ही सोशल मीडियावर कोणताही वादग्रस्त कंटेट पोस्ट करत असाल तर आता जपूनच. आता तुमच्यावर होऊ शकते कारवाई. सोशल मीडिया, OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज पोर्टलसाठी केंद्र सरकारकडून नवी नियमावली आणली जात आहे. त्याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांनी आज (गुरुवार) दिली.

सोशल मीडिया (फेसबुक, ट्विटर आणि इतर), OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज पोर्टलसाठी नियमावली तयार केली जावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे सातत्याने केली जात होती. त्यानुसार, सरकारने महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यानुसार आता सोशल मीडियावर येणाऱ्या ‘फेक न्यूज’वर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी तीन स्तरावर लक्ष ठेवले जाणार आहे. नोडल अधिकाऱ्याची नियुक्तीही केली जाणार आहे. जर तुम्ही कोणतीही वादग्रस्त पोस्ट केली तर तुम्हाला तक्रार दिल्याच्या 24 तासांत संबंधित पोस्ट डिलिट करावी लागणार आहे.

अपलोड केलेल्या व्हिडिओचा सोर्स सांगणे बंधनकारक

जर तुम्ही सोशल मीडियावर कोणताही वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट केला तर तुम्हाला त्याच्या सोर्सची माहिती देणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे अश्लिल कंटेटही तुम्हाला 24 तासांत डिलिट करणे गरजेचे असणार आहे. तसेच पोस्ट सर्वात पहिले कोणी टाकली याचीही माहिती द्यावी लागणार आहे. चुकीच्या वापरावर कारवाई केली जाणार आहे.

3 महिन्यांचा कालावधी लागणार

सध्या या सर्व बाबींकडे लक्ष ठेवले जात असून, येत्या 3 महिन्यांच्या कालावधीनंतर हे नवे नियम लागू होणार आहेत, हेदेखील सरकारकडून सांगण्यात आले आहे.

अफवांना बसणार चाप

दरम्यान, केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी जी नवी नियमावली लागू केली आहे. त्यामुळे तथ्यहीन आणि विनाधार पोस्ट व्हायरल करण्याला लगाम लागणार आहे. त्यामुळे अफवांनाही चाप बसणार आहे.