रेल्वेचे ढिसाळ व्यवस्थापन ! दिल्लीहून महाराष्ट्रात परतणार्‍या विद्यार्थ्यांचे हाल, 24 तासापासून उपाशी ?

नवी दिल्ली : दिल्लीतून महाराष्ट्रात परतणार्‍या 1300 विद्यार्थ्यांचे रेल्वेच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे हाल होत आहे. त्यांना रेल्वे प्रवासात जेवण मिळू शकले नाही. स्वच्छतागृहात पाण्याचा अभाव आहे. महाराष्ट्रातून परत गावी जाताना मजूरांना सर्व सोयी, जेवण, पाणी पुरविण्यात येत असताना दिल्लीतून येणार्‍या या विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे.

नवी दिल्लीत स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी गेलेले शेकडो विद्यार्थी लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतल्याने एक विशेष रेल्वे दिल्लीतून शनिवारी रात्री सोडण्यात आली. जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनवर शनिवारी दिवसभर विद्यार्थ्यांचे स्क्रिनिंग सुरु होते. या १३४५ विद्यार्थ्यांना ५ जनरल डब्यांमध्ये प्रवेश दिला. रेल्वेने एका दिवसाच्या जेवणाची व्यवस्था करणार असल्याचे त्यांना सांगितले होते. मात्र, अद्याप काहीही सोय केली नाही. या विद्यार्थ्यांना मदत करणार्‍यांकडे जेवणाचे पार्सल आहेत. पण हे सर्व विद्यार्थी जनरल डब्यात असल्याने व रेल्वेगाडी कोठेही थांबत नसल्याने त्यांना खाण्याचे सामान पाठविता येत नाही. डब्यांमधील स्वच्छतागृहात पाणी नसल्याने रविवारी सकाळपासून विद्यार्थ्यांना त्यात जाणेही शक्य झालेले नाही.

स्लीपरचे डबे रिकामे असताना सर्व विद्यार्थ्यांना जनरलच्या डब्यात का प्रवेश दिला. असा प्रश्न विद्यार्थी समन्वय राजेश बोनावटे यांनी केला आहे. ही गाडी थेट भुसावळला थांबणार आहे. भुसावळ ५३०, नाशिक १८०, कल्याण १४६ आणि पुणे येथे ४८९ विद्यार्थी उतरणार आहेत. या गाडीत नागपूरपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यातील विद्यार्थी आहेत. रेल्वे स्टेशनला उतरल्यावर स्थानिक प्रशासनाने या विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यात सोडण्याची सोय करावी, असे महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापनच्या अधिकार्‍यांनी कळविले आहे. मात्र, रेल्वेतील हा अनुभव लक्षात घेऊन आपण आपल्या घरी कसे पोहचू, याची या विद्यार्थ्यांना चिंता वाटू लागली आहे. दरम्यान, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी याबाबत ट्विट करून रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.