आमची युती ओवेसींसोबत झाली महाराष्ट्रातल्या नेत्यांसोबत नाही : प्रकाश आंबेडकर

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी वंचितसोबत असलेली युती तुटल्याचे जाहीर केले. यावर भाष्य करताना वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आमची युती ओवेसींसोबत झाली आहे. महाराष्ट्रातल्या नेत्यांशी झाली नाही. ओवेसी याविषयी जोपर्यंत काही स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत आमची युती कायम असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

एमआयएमच्या प्रमुखांसोबत बोलणे झाले असून आमची युती कायम आहे. जागा वाटपाचा विषय गुलदस्त्यात असून त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही असे आंबेडकर यांनी सांगितले. वंचित आघाडीतून एमआयएम बाहेर पडल्याचे वृत्त फेटाळून लावत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून युती तोडण्याबाबत जाहीर केले जात नाही, तोपर्यंत युती कायम असल्याची भूमिका वंचित आघाडीने घेतली असल्याचे प्रकाश आंबडकर यांनी सांगितले.

खासदार इम्तियाज जलील यांनी वंचित सोबत असलेली युती तोडण्याच्या केलेल्या घोषणेची दखल घेतली जात नसल्याचे वंचितने स्पष्ट केले आहे. एमआयएमचे राज्यातील नेतृत्त्व आणि वंचित आघाडीच्या नेत्यांमधील विस्तव जात नसल्याचेही यामुळे चव्हाट्यावर आले होते, अखेर प्रकाश आंबडेकर यांनी याचे स्पष्टीकरण दिले आहे.