दशक्रिया विधीपूर्वी बजावला मतदानाचा हक्क

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वैय्यक्तिक कर्तव्यासोबत राष्ट्रीय कर्तव्य बजावणे तितकेच महत्वाचे आहे असे म्हणात सरपोतदार बंधूनी मतदान करून हक्क बजावला. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान सुरु असून मतदानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कडकडीचे ऊन असल्यामुळे उन्हाच्या आधी मतदान करण्यासाठी नागरिकांची गर्दी जमली आहे. मतदान हे आपले आद्यकर्तव्य असल्याने पुण्यातील विवेक विकास सरपोतदार आणि योगेश विकास सरपोतदार व त्यांचे वडील विकास सरपोतदार यांनी शनिवार पेठेतील अहिल्यादेवी शाळेत जाऊन मतदान केले. विशेष म्हणजे त्यांच्या आईची आज दशक्रियाविधी असतांनाही त्यांनी आपला मतदानाचा हक्क सोडला नाही. आधी राष्ट्रीय कर्तव्य केले आणि मग त्यांनी आपल्या आईच्या दशक्रियाविधीसाठी ओंकारेश्वर घाट गाठला.

यावेळी सरपोतदार बंधु म्हणाले की, आमच्या आईने आजारी असतानाही कधी मतदान करायचे चुकवले नाही. त्यामुळे आम्ही सुद्धा आज दशक्रियाविधी पूर्वी मतदान करण्याचा हक्क बजावला. तुम्हीही सर्वांनी मतदानाचा हक्क सोडू नका असे सरपोतदार बंधुंनी नागरिकांना आवाहनही केले.