विधान परिषद निवडणूक निकाल : आमचा एकतरी आला, आता तुम्हीही आत्मचिंतन करा, फडणवीसांचा शिवसेनेला टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक निकालावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला डिवचले आहे. ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही. दोन पक्षांना फायदा झाला, जसे आम्ही आत्मचिंतन केले पाहिजे, तसे ज्यांचा मुख्यमंत्री आहे त्यांची एकही जागा येत नाही, त्यांनीही आत्मचिंतन करावे, असा सल्ला फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेता दिला आहे.

विधान परिषदेच्या सहा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी दोन, भाजप 1 आणि अपक्ष 1 असे चित्र आहे. भाजपला या निवडणुकीत जोरदार फटका बसला असून, नागपूर आणि पुणे हे पारंपरिक मतदारसंघ मात्र गमवावे लागले आहेत. यावर फडणवीस आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात एकच जागा जिंकता आल्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी आम्ही बेसावध राहिल्याची कबुली दिली आहे. यामुळेच निकालात बदल दिसला, आम्ही कुठे कमी पडलो त्याचे विश्लेषण करू, पण भाजपची पीछेहाट अजिबात नाही, असे ते म्हणाले.

ही महाविकास आघाडीची महाराष्ट्र एक्स्प्रेस : चव्हाण

महाविकास आघाडीचे नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनीदेखील ट्विट करत भाजपवर निशाना साधला आहे. थेट जनतेतून मतदान झालेल्या पाच विधान परिषद मतदारसंघांच्या निवडणुकीत कोल्हापूरपासून गोंदियापर्यंत तब्बल 24 जिल्ह्यांमध्ये भाजपची धुळधाण झाली आहे. ही महाविकास आघाडीची महाराष्ट्र एक्स्प्रेस आहे, अशी टीका केली आहे.