Pune News : बहिणीशी प्रेमसंबंधाचा राग; 15 वर्षीय मुलावर कोयत्याने वार

विश्रांतवाडी : पोलीसनामा ऑनलाइन – बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून भावाने आणि त्याच्या तिघा मित्रांनी मिळून एका 15 वर्षीय मुलाच्या डोक्यावर कोयत्याने सपासप वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच मुलाला वाचविण्यासाठी आलेल्या त्याच्या आईलाही लोखंडी रॉडने मारहाण केली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

प्रतीक ओव्हाळ (वय 23), सुनील ओहाळ (50), आशिष मोरे (22) आणि जीवन परियार (वय 24, रा. सर्व धानोरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर राजू गौतम भिसे (वय 15, राज भैरवनगर, धानोरी) असे मारहाणीत गंभीर झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी तरुणाची आई सुनीता भिसे (वय 47) यांनी फिर्याद दिली आहे.

विश्रांतवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक ओव्हाळ याच्या बहिणीशी जखमी राजू भिसे याचे प्रेमसंबंध होते. हा प्रकार तिच्या भावाला मान्य नव्हता. यामुळे अनेक दिवसांपासून तो राजूवर चिडून होता. त्यामुळे प्रतीक हा आपल्या मित्राच्या साथीने राजूवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असून चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गेल्या वर्षीही प्रतीक ओव्हाळ आणि त्याचा मित्र आशिष मोरे यांनी राजूला शिवीगाळ करून मारहाण केली होती.