ओढ्यात मुदतबाह्य औषधांचा मोठा साठा, आरोग्य विभागाकडून पंचनामा

पोलीसनामा ऑनलाईन – उदगाव येथील रेल्वे स्टेशन रस्त्यालगत असणाऱ्या ओढ्यामध्ये अज्ञात व्यक्तीने कालबाह्य झालेल्या औषधांचा मोठा साठा फेकून दिल्याचे आढळून आले. याबाबत मनसेचे तालुकाध्यक्ष कुबेर मगदूम व सचिव श्रीकांत सुतार यांनी ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र जयसिंगपूर यांना माहिती दिली. आरोग्य विभागाने याचा पंचनामा केला असून लवकरच अहवाल वरिष्ठांना दिला जाणार आहे.

मनसेचे तालुकाध्यक्ष कुबेर मगदूम यांना या ओढ्यात कालबाह्य झालेल्या औषधांचा मोठा साठा टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबत जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ए. एस. चौगुले यांच्यासह जिल्हा परिषद सदस्या, सरपंच, ग्रामविकास अधिकारी, उपसरपंच यांना माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य स्वाती सासने यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलणी करून याची माहिती देऊन योग्य कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

याप्रसंगी सरपंच पूजा कोळी, वैद्यकीय अधिकारी एन. एस. चौगुले, जिल्हा परिषद सदस्या स्वाती सासने, पर्यवेक्षक डी. आर. तराळ, एस. एस. धर्माधिकारी, पोलीस पाटील अनुराधा कांबळे, सरपंच पूजा कोळी, उपसरपंच पंकज मगदूम, ग्रामविकास अधिकारी ए. आर. बिडकर, मनसेचे तालुकाध्यक्ष मगदूम, सचिव श्रीकांत सुतार, शांतिनाथ व्हराटे, सम्मेद चौगुले, जालंदर बंडगर उपस्थित होते.