‘कोरोना’ महामारीत शेतकऱ्यांवर ‘या’ नव्या व्हायरसचं मोठं संकट ! राज्यातील बळीराजा हतबल

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – आधीच राज्यावर कोरोनाचं मोठं संकट आलं आहे. अशात लॉकडाऊनमुळं देखील आर्थिक संकट आहे. अशात राज्यात आसमानी संकट आलं. राज्याच्या पोशिंद्यावर व्हायरसचं मोठं संकट कोसळलं आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर तालुक्यातील केळीच्या ग्रीन बेल्टमध्ये कुकुंबर मोझाक व्हायरस (सीएमव्ही) रोगानं हाहाकार माजवला आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर हा भाग केळी उत्पादनासाठी खूप प्रसिद्ध आहे.

यावर्षीही व्हायरसनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळं आता केळीची रोपं उपटून फेकण्याची वेळ केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. गेल्या 3 वर्षांपासून केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. टिश्यू कल्चर केळी रोपे जैन या जळगावातील प्रसिद्ध कंपनीचे असून या रोपांमध्ये कुठल्याही प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती कंपनीनं तयार केलेली नाही. हेच कारण आहे की, गेल्या 3 वर्षांपासून हा रोग जास्त थैमान घालताना दिसत आहे. यामुळं शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागत आहे.

जुलै महिन्यात लागवड केलेल्या टिश्यू कल्चर रोपांवर रोगाचं प्रमाण सर्वाधिक असून किमान 2 हजार हेक्टर्स केळीवर हा रोग आला आहे अशी माहिती आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, यातील 200 हेक्टर्स केळी शेतकऱ्यांनी उपटून फेकली आहे. तज्ज्ञ सांगतात की, पावसाची संततधार आणि ढगाळ वातावरण यामुळं रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. परंतु टिश्यू कल्चर केळी रोपं जुलैत लागवड झाली आहे. याच रोपांवर हा रोग आला आहे असं शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे. संबंधित कंपनीनं याची भरपाई करावी अशी मागणी देखील शेतकरी करताना दिसत आहेत.