धक्कादायक ! दिल्लीत 24 % लोकांमध्ये ‘कोरोना’चा प्रादुर्भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत 23.48 टक्के लोकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असून त्यातील बहुतांश लक्षणविरहित असल्याचे सीरो सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राजधानीतील सुमारे 77 टक्के रहिवाशांना अजूनही संसर्ग होण्याचा धोका असून प्रतिबंधात्मक उपायांचा वापर अत्यावश्यक असल्याचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

एखाद्या व्यक्तीला विषाणूची बाधा झाली असेल तर, विषाणूविरोधात लढण्यासाठी तिच्या शरीरात प्रतिपिंडे निर्माण होतात. या प्रतिपिंडाचा शोध घेण्यासाठी सीरो सर्वेक्षण केले जाते. दिल्लीमध्ये 27 जून ते 10 जुलै या काळात 11 जिल्ह्यांमध्ये 21 हजार 387 व्यक्तींची चाचणी केली गेली. त्यात सुमारे 24 टक्के लोकांमध्ये प्रतिपिंडे आढळली. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी) या संस्थांनी सीरो सर्वेक्षण केले. दिल्लीतील हे सर्वेक्षण जूनच्या मध्यात करण्यात आले असून या दिवसांमध्ये राजधानीत प्रतिदिन 3 हजार रुग्णवाढ होत होती.

जुलै अखेपर्यंत काही लाख रुग्ण दिल्लीत आढळतील अशी भीती व्यक्त केली जात होती. घनदाट लोकसंख्या असलेल्या दिल्लीतील काही निवासी भागांमध्ये ज्या काळात रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत होती तेव्हाही दिल्लीत फक्त 24 टक्के लोक कोरोनाबाधित झाले, असे नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल म्हणाले. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन सहा महिने झाले असून आता दिल्लीतील परिस्थिती आटोक्यात आणली गेली आहे. त्यामुळे गेल्या चोवीस तासांमध्ये 950 रुग्णांची वाढ झाली आहे. प्रतिदिन रुग्णवाढ 1 हजापर्यंत खाली आणली गेली आहे. जूनमध्ये प्रतिदिन 9 हजार नमुना चाचण्या केल्या जात आहेत.