पत्नीकडून नवर्‍याच्या दुसर्‍या बायकोला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, महिलेला अटक

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – सवती मत्सराने पेटलेल्या एका महिलेने आपल्या नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोला जिवंत जाळण्याचा ( outburst jealousy-attempt-wife-set-fire-husbands-second-wife) प्रयत्न केला. नागपूरात पोलिसांदेखत शनिवारी (दि. 21) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास भरोसा सेल मध्ये ही घटना घडली. या घटनेने भरोसा सेलमध्ये एकच खळबळ उडाली. प्रसंगावधान राखत वेळीच पोलिसांनी आरोपी महिलेला पकडल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

सविता विनोद सव्वालाखे (वय 39) असे आरोपी महिलेचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विनोद सव्वालाखे हा शांतीनगरात राहतो. त्याचे पॅकेजिंगचे काम आहे. मौसमी शेखर झोडे (वय 32 ) ही त्याच्याकडे काम करीत होती. तिच्या पतीचे निधन झाल्याने मौसमी आणि विनोदचे सूत जुळले होते. विनोद आपल्या पत्नी, मुलांना अंधारात ठेवून मौसमी सोबत 19 मार्च 2020 रोजी लग्न केले होते. हा प्रकार माहीत झाल्यानंतर विनोदच्या घरी वाद विकोपाला गेला. प्रकरण थेट शांतीनगर पोलीसात गेले. त्यांनी दोन्ही महिलांची समुपदेशन करण्यासाठी त्यांना भरोसा सेलमध्ये पाठविले.

त्याठिकाणी शनिवारी दुपारी सर्वजण भरोसा सेलच्या आवारात बेंचवर बसले होते. अचानक सविताने धावत येऊन मौसमीच्या अंगावर पेट्रोलची भरलेली बाटली ओतली. लगेच तिने जवळ लपवून ठेवलेली माचीसही बाहेर काढली. हा प्रकार पाहून प्रसंगावधान राखत बाजूला असलेल्या महिला पोलीस धावून आल्या. त्यांनी सविताला घट्ट पकडून ठेवले. मौसमीच्या अंगावर पाणी ओतले. घटनेनंतर भरोसा सेलमध्ये एकच खळबळ उडाली. तेथील महिला पोलिसांनी सविताला पकडून प्रतापनगर ठाण्यात आणले. या प्रकारामुळे मौसमी प्रचंड घाबरली होती. मात्र सविताचा थयथयाट पोलीस ठाण्यातही सुरूच होता. हिला सोडणार नाही, असे ती ओरडून सांगत होती. या प्रकरणी मौसमीने तक्रार दिली आहे. त्यावरून सविताविरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.