काय सांगता ! हो, पोस्टमनमुळं एकाच गावातील 100 जणांना ‘कोरोना’, ग्रामस्थांकडून Lockdown जाहीर

तेलंगणा : वृत्तसंस्था – तेलंगणात पेंशन वाटप करणाऱ्यामुळं संपूर्ण गावात कोरोनाचा फैलाव झाल्याचं समोर आलं आहे. गावात गेल्या 10 दिवसात तब्बल 102 कोरोना रुग्ण आढळले आहेत. गावात 10 दिवसांपूर्वी जिल्हा मुख्यालयातून एक पोस्टमन आला होता. तिथूनच कोरोनाचा फैलाव होण्यास सुरुवात झाल्याचं समजत आहे. सर्वात आधी तर ज्यांना पेंशन वाटप केली त्यांना आणि नंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना झाल्याचं रिपोर्टमधून समोर आलं.

या गावात आता सुरक्षिततेचा उपाय म्हणून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. इतकंच नाही तर यानंतर गावात मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या जाताना दिसत आहेत. गावात एकूण 21 कंटेटमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं तर गेल्या एकाच आठवड्यात 337 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनातून बऱ्या झालेल्या 2 आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याचं तेलंगणाच्या आरोग्य मंत्र्यांनी मंगळवारी स्पष्ट केलं. तेलंगणाबद्दल बोलायचं झालं तर 26 ऑगस्टपर्यंत तेलंगणात 1 लाख 11 हजार 688 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 780 जणांचा मृत्यू झाला आहे.