Loksabha 2019 : सिने कलावंतांचा भाजपाविरोधात एल्गार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या भाजपला मत देऊ नका असे आवाहन करीत देशभरातले १०० हून अधिक कलाकार, फिल्ममेकर्स भाजपाविरोधात एकवटले. आर्टिस्ट युनायटेड इंडिया अंतर्गत हे सर्व फिल्म मेकर्स एकत्र आले आहेत.

भाजपा विरोधात मतदान करण्याचे आवाहन भारतातल्या १०० हून अधिक फिल्ममेकर्सने केले आहे. या संदर्भात त्यांनी एक संयुक्त पत्रक प्रसिद्धीला दिले आहे. प्रसिध्द माहितीपट निर्माते आनंद पटवर्धन पासून ते जुजे फिल्मचा दिग्दर्शक मिरांशा नाईकपर्यंत जवळपास १११ लोकांनी या भाजपा विरोधात मतदान करण्याच्या पत्रकावर सह्या केल्या आहेत.

भाजपा सरकार आल्यानंतर अभिव्यक्ति स्वातंत्र्याची जास्तीत जास्त गळचेपी व्हायला लागली असा आरोप या सर्वांनी केला. समाजात हिंदू मुस्लीम तेढ वाढवणे, मागासवगीर्यांवर होणारा अन्याय, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे होणारे दुर्लक्ष आणि सेन्सॉरशीपच्या नावाखाली उगाच होणारी गळचेपी ही या विरोधाची मुख्य कारणे आहेत.

सरकारच्या अघोरी धोरणाविरोधात आवाज उठवणे हा गुन्हा ठरत आहे. देशविरोधी ठरवले जात आहे, असे या कलाकारांचे म्हणणे आहे. भाजपाला रोखण्यासाठी लोकसभा निवडणूक ही अखेरची संधी आहे, असे आर्टिस्ट युनायटेड इंडियाचे म्हणणे आहे. त्यामुळे लोकांमध्ये जागृती करण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.