केरळमध्ये रेल्वे प्रवासी महिलेकडून 117 जिलेटिन कांड्या, 350 डिटोनेटर्स जप्त

कोझिकोड : दक्षिण मुंबईत एका स्कॉपिओमध्ये जिलेटिन कांड्या सापडल्याची घटना ताजी असतानाच केरळमधील कोझिकोड रेल्वे स्थानकात जिलेटिन कांड्या आणि डिटोनेटर्सचा मोठा साठा सापडला आहे. केरळमधील कोझिकोड रेल्वे स्थानकात एका रेल्वे प्रवाशांकडून ११७ जिलेटिन कांड्या आणि ३५० डिटोनेटर्स जप्त करण्यात आले आहे. चेन्नई -मंगलापुरम एक्सप्रेसमधील एका महिला प्रवाशांकडून स्फोटकाचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

मुळची तामिळनाडुची रहिवासी असलेल्या रमणी हिला ताब्यात घेण्यात आले आहे. चेन्नईहून मंगलापूरम सुपरफास्ट एक्सप्रेस शुक्रवारी सकाळी कोझिकोड रेल्वे स्थानकावर आली. या वेळी रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने एका महिलेला संशयावरुन ताब्यात घेतले. तिच्याकडील सामानाची तपासणी केल्यावर त्यात तब्बल ११७ जिलेटीन कांड्या आणि ३५० डिटोनेटर्स आढळून आले. गुरुवारी दक्षिण मुंबईत एका स्कॉपिओमध्ये जिलेटिन कांड्या आढळून आल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर जिलेटिन कांड्या आढळल्याने एकच खळबळ उडाली.

रमणी या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरु करण्यात आली. त्यात तिने विहीर खोदण्यासाठी जिलेटिनच्या काड्या आणल्या असल्याचे सांगितले.