CAA कायद्याच्या ‘समर्थनार्थ’ 1000 विचारवंत मैदानात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात आंदोलनं सुरु असताना दुसरीकडे या कायद्याला पाठिंबा देण्यासाठी एक हजार विचावंत मैदानात उतरले आहेत. कायद्याच्या समर्थनार्थ विचारवंतांसोबत संशोधक देखील पुढे सरसावले आहेत. एक हजार विचारवंत आणि संशोधकांनी संयुक्त पत्रक प्रसिद्ध करत या कायद्याला पाठिंबा दर्शवला आहे. बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या अल्पसंख्यांक निर्वासितांना नागरिकत्व देण्याची जुनी मागणी या कायद्यामुळे मान्य झाली असल्याचे पत्रकात म्हटलं आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा मुस्लिमांविरुद्ध असल्याचा आरोप करत देशातील विविध राज्यांमध्ये आंदोलनं सुरु आहे. मात्र, या कायद्याच्या बाजूने पहिल्यांदाच एवढा मोठा समुदाय मैदानात उतरला आहे. 1950 ला झालेला नेहरू लिकायकत करार अपयशी ठरल्यापासून काँग्रेस, सीपीएमसह अनेक पक्षांनी विचारधारा बाजूला ठेवत अल्पसंख्यांक निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याची मागणी या पत्रकातून करण्यात आली आहे.

लोक ज्यांना विसरले होते, त्या अल्पसंख्यांकांच्या मागे उभे राहिल्याबद्दल या विचारवंतांनी संसद आणि सरकारचे अभिनंदन केले आहे. तसेच संसदेने भारतीय संस्कृतीचे दर्शन करुन दिल्याचे पत्रात म्हटलं आहे. ईशान्य भारतातील राज्यांना जी चिंता होती, त्याची दखल घेतली आणि योग्य पद्धतीने त्यावर तोडगा काढला त्याबद्दलही आम्ही समाधान व्यक्त करतो. नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा पूर्णपणे भारतीय घटनेला धरून आहे, जो ना कोणत्या देशाच्या, धर्माच्या नागरिकाला भारतीय नागरिक होण्यापासून रोखतो, ना नागरिकत्वाचे निकष बदलतो, असे या पत्रकाद्वारे म्हटलं आहे.

बांगलादेश पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधील अहमदी, हझारस आणि बलोच यांनाही नियमित पद्धतीने भारतीय नागरिकत्व स्वीकारण्यास हा कायदा रोखत नाही, असेही या विचारवंतांनी सांगितले. देशात भीती आणि विकृतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे, ज्यामुळे विविध भागात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. समाझातील सर्व घटकांनी हा अपप्रचार हाणून पाडावा असे आवाहन पत्रकातून करण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/