देशात महापुरामुळे ‘हाहाकार’, १९० जणांचा मृत्यू तर लाखो लोकांचे ‘स्थलांतर’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – पावसाच्या पुरामुळे देशामध्ये परिस्थिती गंभीर आहे. सर्वसामान्यांचे जीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. महाराष्ट्रासह चार राज्यांत आलेल्या महापुरामुळे आतापर्यंत १९० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात महाराष्ट्रात ४०, कर्नाटकात ६०, गुजरातमध्ये २२ आणि केरळमध्ये ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सुमारे सात लाख लोकांचे आणि केरळमध्ये दोन लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कोल्हापुरात २ लाख ४५ हजार २२९ जणांचं स्थलांतर करण्यात आले असून सांगलीत ४ लाख ४१ हजार ८४५ जणांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.

कर्नाटकमध्येही पुराने हाहाकार माजवला असून कर्नाटकात एकूण ६० लोक दगावले आहेत. तुंगभद्रा नदीच्या पाण्यामुळे दावणगिरी जिल्ह्याचे अनेक भाग पाण्याखाली गेले असून, अनेक रस्ते बंद झाले आहेत. मदतकार्याला सरकारचे प्राधान्य असल्यामुळे राज्यातील लोकांनी काळजी करू नये, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी म्हटले आहे. बेबत्ता झालेल्या लोकांचा तपास सुरु आहे तर लोकांच्या मदतीसाठी सरकारने ९२४ हुन अधिक  छावण्या उभ्या केलेल्या आहेत.

केरळमधील जनजीवन विस्कळीत –

केरळमध्ये महापुराने थैमान घातले असून २ लाख २७ हजरांहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे, तर ६७जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी रविवारी पूरस्थितीची हवाई पाहणी केली आणि आवश्यक पावले उचलण्याच्या सूचना दिल्या. केरळच्या पूरग्रस्त भागामध्ये दीड हजारांपेक्षा जास्त मदत छावण्या कार्यरत आहेत. कन्नूर, कासरागड, वायनाड या जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. केरळमधील रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली असून रेल्वे ने प्रवास करणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ वाढतोय – प्रत्येक राज्यांमध्ये मदतीचा ओघ वाढायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर, नाशिक, मुंबई अशा सर्वच शहरांमधून पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर मदत पाठवली जात आहे. रोख पैशांच्या स्वरूपातही अनेक जण मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. दररोज लागणारे साहित्य तसेच खाण्याच्या वस्तू मोठ्या प्रमाणावर पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात येत आहेत. सोशल मीडियाच्या आधारे अनेक सामाजिक संस्थांद्वारे मदतीचा हात पुढे केला जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त