धक्कादायक ! NFAI मधील चित्रपटांची ३१ हजार दुर्मिळ रिळे नष्ट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडील ३१ हजारांपेक्षा अधिक रिळे गहाळ किंवा नष्ट झाली असल्याची धक्कादायक माहिती ‘कॅग’ ने प्रसिद्ध केलेल्या अहवालाद्वारे उघड झाली आहे. दुर्मिळ चित्रपटांची ३१ हजार रिळे गहाळ किंवा नष्ट होण्याने चित्रपट जतन चळवळीला मोठा धक्का बसला आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक अर्थात कॅगने ठपका ठेवल्यामुळे संग्रहालयाच्या संपूर्ण कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कॅगचा अहवाल –
संग्रहालयामध्ये २०१० मध्ये माहिती नोंदविण्याचे (डेटा एन्ट्री) काम सुरू झाले. एकूण तीन लाख सत्तर हजार या संख्येने असलेल्या चित्रपट साहित्याला बारकोड लावण्याचे काम करण्यात आले. २०१६-१७ मध्ये चित्रपटांची १ लाख ३२ हजार रिळे उपलब्ध होती. बारकोड लावण्याचे काम केलेल्या ठेकेदाराच्या बिलानुसार १ लाख ३७७ रिळे उपलब्ध असल्याचे समोर आले. यादरम्यान, ३१ हजार २६३ रीळांचे डबे हरवले किंवा नष्ट करण्यात आले. ‘कॅग’ ने १ मे २०१५ ते ३० सप्टेंबर २०१७ या कालावधीत संग्रहालयातील साहित्याची तपासणी केल्यानंतर ही तफावत उघड झाली. आधी नोंदवलेली माहिती आणि रिळांची प्रत्यक्षातील संख्या यामधील फरकावरून ‘कॅग’ ने संग्रहालयाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

संग्रहालयाचे दुर्लक्ष –
संग्रहालयाच्या दुर्लक्षामुळे चित्रपटवारशाचे मोठे नुकसान झाले आहे. रिळांचे जतन करण्यासाठी विशिष्ट तापमानाची गरज असताना वॉल्टमध्ये पंख्याच्या हवेत रिळे ठेवण्यात येत आहेत. आजही चित्रपटांच्या रिळे व इतर साहित्य पोत्यात भरून ठेवल्याचे उघड झाले आहे.

NFAI विषयी –
देशातील चित्रपटाचा वारसा जतन करण्यासाठी केंद्र्र सरकारने १ फेब्रुवारी १९६४ रोजी संग्रहालयाची स्थापना केली. चित्रपटांच्या रिळे, व्हिडिओ कॅसेट, डीव्हीडी, पुस्तके, पोस्टर, प्रेस क्लिपिंग, ध्वनिफिती या माध्यमातून १०६ वर्षांचा दुर्मिळ खजिना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे जतन करण्यात आला आहे.

देशात केवळ पुण्यात असलेली ही संस्था केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत काम करते. चित्रपटाचा वारसा जतन करणे, रिळांचे जतन व संवर्धन, चित्रपटसाहित्याचे जतन, चित्रपटाबद्दल जागृती वाढवणे हे संग्रहालयाचे प्रमुख काम आहे.