हॉर्न वाजवून ओव्हरटेक केले, त्याने डोक्यात हेल्मेट घातले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दुचाकीवरून जाताना इतरांसोबत किरकोळ वाद होतात. त्यांचे रुपांतर भांडणातही होते. परंतु पुण्यातील टिळक रस्त्यावर हॉर्न वाजवून ओव्हरटेक केल्याने बाचाबाची झाली. त्यात एकाने दुचाकीचालकाचे हेल्मेट घेऊन त्याच्याच डोक्यात मारले. त्यानंतर याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलीसांनी एकाला अटक केली.

सिद्धार्थ सुनील पायगुडे (३२, शुक्रवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणी निलेश प्रल्हाद काळे (३८, अप्पर इंदिरानगर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश काळे हे टिळक रस्त्यावरून बुधवारी दुपारी जात होते. त्यावेळी सिद्धार्थ पायगुडे हा देखील दुचाकीवरून त्यांच्या समोर जात होता. त्यांनी हॉर्न वाजवून सिद्धार्थ पायगुडेच्या दुचाकीला ओव्हरटेक केले. त्यावेळी सिद्धार्थ पायगुडे तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटला. त्यामुळे फिर्यादी काळे यानी त्याला विचारणा केली. त्याने दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. त्यानंतर दोघांनी आपापले हेल्मेट काढले असताना त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर पायगुडे याने तेच हेल्मेट घेऊन काळे यांच्या डोक्यात मारहाण केली. त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेतली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शरद शिंदे करत आहेत.