धक्कादायक ! पुण्यात महिलेवर रात्रभर टेम्पोमध्ये ‘बलात्कार’, पिंपरी-चिंचवडमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आळंदी येथील एका महिलेवर टेम्पोचालक व क्लिनर यांनी टेम्पोमध्येच रात्रभर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार आळंदी ते पिंपरी चिंचवड परिसरात १० मार्चला रात्री अकरा ते ११ मार्च रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान घडला आहे.

याप्रकरणी एका २९वर्षाच्या महिलेने आळंदी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरुन पोलिसांनी आयशर टेम्पो चालक व क्लिनर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, आळंदी येथील या महिलेला १० मार्च रोजी रात्री ११ वाजता टेम्पो चालकाने पेरणे फाटा येथे घेऊन जातो, असे सांगून गाडीत बसवून घेतले.

त्यानंतर त्याने टेम्पो पेरणेफाटा येथे घेऊन न जाता तो पिंपरी चिचवडच्या दिशेने वळविला. त्यानंतर टेम्पोमध्येच तिच्यावर चालक व क्लिनर यांनी आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी या महिलेला शिवीगाळ करुन मारहाण केल. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पिंपरी चिंचवडला सोडून देऊन ते पसार झाले. या घटनेनंतर ही महिला परत आळंदी येथे आली. तिने आळंदी पोलिसांशी संपर्क साधला. बुधवारी रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक लोहेकर अधिक तपास करीत आहेत.