ओवेसी हैद्राबाद मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात

हैद्राबाद : वृत्तसंस्था – ऑल इण्डिया मजलिस ऐ इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख बैरिस्टर असदउद्दीन ओवेसी यांनी हैद्राबाद मतदार संघातून लोकसभेसाठी आपले नामांकन दाखल केले आहे. याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

ओवेसी यांनी तीन वेळा हैद्राबादचे खासदारपद भूषवले आहे. यापूर्वी २००४,२००९आणि २०१४ मध्ये त्यांनी या क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले होते. हैद्राबाद म्हणजे ओवेसी यांचा हक्काचा मतदारसंघ मनाला जातो. त्यांच्या वडिलांनी देखील याठिकाणाहूनच आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती.

२००४ पूर्वी, त्यांचे वडील सुल्तान सलाहुद्दीन ओवेसी हे हैद्राबादच्या मतदारसंघातून दोन दशकांहून अधिक काळचे खासदार राहिले आहेत. १९९४ ते २००३ या काळात असदुद्दीन ओवेसी स्वतः आंध्र प्रदेश विधानसभा सदस्यही होते. असदुद्दीन ओवेसीचा धाकटा भाऊ अकबरुद्दीन ओवेसी तेलंगना विधानसभा सदस्य आहे. हैद्राबादचे भाजप आणि कॉंग्रेस एक मजबूत उमेदवाराच्या शोधात आहेत. मागील निवडणुकीत भाजपचे उमेदवार एन रामचंद्र राव यांनी ३२ टक्के मते पडली होती. हैदराबाद सध्या तेलंगना आणि आंध्रप्रदेशची संयुक्त राजधानी आहे.