रेडीरेकनर दरातील वाढीमुळे पुण्यात घर आवाक्याबाहेर

पोलिसनामा ऑनलाईन – राज्याला महसूल मिळण्यासाठी शासनाने घरनोंदणी शुल्कात कपात केली आहे. दुसरीकडे मात्र, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने वार्षिक मूल्यदर तक्ते (रेडीरेकनर) दरात सर्वाधिक वाढ पुण्यात केली आहे. शहरात 1.56 टक्के वाढ झाल्याने मध्यवर्ती भाग आणि उपनगरांमधील सदनिकांचे भाव चढेच राहणार आहेत. परिणामी पुण्यात हक्काचे घर आवाक्याबाहेर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहराच्या मूळ हद्दीत 1.25 टक्के आणि विस्तारित हद्दीसाठी 1.88 टक्के अशी सरासरी 1.56 टक्के वाढ झाली आहे. परिणामी शहराच्या सर्वच भागात रेडीरेकनरचे दर वाढले आहेत. कोरेगाव पार्क आणि प्रभात रस्ता या ठिकाणी नेहमीच रेडीरेकनरचे दर सर्वाधिक असतात. या ठिकाणी हा दर अनुक्रमे 14 हजार 580 आणि 13 हजार 167 प्रति चौरस फू टपर्यंत पोहोचला आहे. कोरेगाव पार्क रस्त्यावरील रेल्वे ओलांडणी पूल ते बंडगार्डन पुलापर्यंतचा परिसर शहरातील सर्वाधिक महाग परिसर आहे. तर, प्रभात रस्त्यावरील ज्ञानकोशकार केतकर रस्ता हा भाग दुसर्‍या क्रमांकावर महाग परिसर आहे. याशिवाय ज्ञानेश्वर पादुका चौक ते गणेशखिंड रस्त्याला जोडणारा रस्ता, भांडारकर रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, डॉ. केतकर रस्ता, जंगली महाराज रस्ता, बोट क्लब रस्ता, नॉर्थ मेन रोड ते भैरोबा पंपिंग स्टेशन, कर्वे रस्ता, फग्र्युसन रस्ता, विद्यापीठ रस्ता आणि आयडियल कॉलनी हे परिसर देखील महागडे झाले आहेत.