फरार आरोपीस तब्बल 19 वर्षांनी अटक; पैशाच्या वादातून केली होती मालकाची हत्या

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पैशाच्या वादातून आपल्याच मालकाचा खून करून तब्बल 19 वर्षे फरार असलेल्या नोकरास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-1 च्या पथकाने गुरुवारी (दि. 18) ( owner-killed-money-dispute-arrested-after-19-years) अटक केली. त्याला रामनगर (डोंबिवली) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राजाराम राजीव शेट्टी (65) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सिप्रेम जोसेफ रेगो (53, रा. डोंबिवली) असे खून झालेल्या मालकाचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, डोंबिवलीतील सुखनिवास लॉज येथे राहणारे रेगो यांचे त्यांची देखभाल करणारा राजाराम शेट्टी याचे 8 मे 2001 रोजी पैशांवरून भांडण झाले होते. हे भांडण विकोपाला गेल्यामुळे राजाराम याने रेगो यांच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारून त्यांचा खून करून तो पसार झाला होता. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात खून आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी राजाराम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तो कर्नाटकातील कुद्र (जिल्हा-उडपी) येथील रहिवासी असल्यामुळे गावी, तसेच महाराष्ट्रातील नाशिकसह वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करीत होता. त्यामुळेच तो पोलिसांना मिळत नव्हता. दरम्यान, तो ठाण्यातील विटावा ब्रिजजवळ येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार आनंदा भिलारे यांना मिळाली होती. त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक व पथकाने गुरुवारी (दि. 19) नाेव्हेंबरला त्याला ताब्यात घेतले. आरोपीविरोधात सीआरपीसी 299 नुसार दोषारोपपत्र दाखल केले आहे. दरम्यान, तब्बल 19 वर्षे पाठपुरावा करून आरोपीला कौशल्याने अटक केल्याने युनिट-1 च्या तपास पथकाचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी अभिनंदन केले आहे.