1 कोटी 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध ‘मराठे ज्वेलर्स’च्या मालकांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विश्वासघात करत 1 कोटी 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी अनेक नागरिकांचे पैसे घेऊन त्यांना परतावा दिला नाही.

याप्रकरणी शुभांगी कुटे (रा. कोथरुड) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार कोथरुड पोलीस ठाण्यात मिलिंद उर्फ बळवंत अरविंद मराठे, कौस्तुभ अरविंद मराठे, मंजिरी कौस्तुभ मराठे, नीना मिलिंद मराठे व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात भादवि कलम 420, 409, 406, 34 सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध कायदा कलम 3 नुसार गुन्हा दाखल आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पौड रोड परिसरात राहतात. दरम्यान, कौस्तुभ व मिलिंद उर्फ बळवंत मराठे यांनी फिर्यादी  यांना 2017 मध्ये त्यांच्या ज्वेलर्सच्या दुकानातील सुरू असलेल्या स्कीममध्ये गुंतवणूक करा, केलेली गुंतवणूक सुरक्षित राहील व फसवणूक होणार नाही, असे म्हणत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांनी विश्वास ठेवून गुंतवणूक केली. पण त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम व त्यावरील परतावा अशी एकूण 37 लाख 80 हजार रुपये न देता फिर्यादी यांची फसवणूक केली. तसेच फिर्यादी  यांच्या सोलापूरच्या एका नातेवाईकाने 25 लाख व इतरांनी देखील फिर्यादी प्रमाणे गुंतवणूक केली होती. अशी सर्वांची मिळून 1 कोटी 5 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. हा सर्व प्रकार 2017 ते 2021 या कालावधीत घडला आहे. याबाबत फिर्यादी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची चौकशी करण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिलिंद मराठे यांची गोळी झाडून आत्महत्या
डिसेंबर महिन्यात मिलिंद उर्फ बळवंत अरविंद मराठे यांनी दुकानातच स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा 12 दिवसांनी (27 डिसेंबर) त्यांचा मृत्यू झाला होता. यावेळी त्यांनी आर्थिक चनचणीतून आत्महत्या केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. तसेच त्यांचा मुलगा प्रणव यांनी दिलेल्या जबाबात म्हंटले होते.