Coronavirus Vaccine : ‘ऑक्सफर्ड’ लशीच्या चाचण्यांना ‘केईएम’च्या समितीची परवानगी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – केईएमच्या एथिक्स समितीने ऑक्सफर्ड लशीच्या चाचण्या करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच मुंबईत चाचण्यांची प्रक्रिया सुरू होणार आहे. सिरम इन्स्टिटयूटकडून पुणे आणि मुंबईत ऑक्सफर्डच्या लशीच्या चाचण्या केल्या जात आहेत. मुंबईत केईएम आणि नायर रुग्णालयात या चाचण्या होणार आहेत.

केईएमच्या एथिक्स समितीने लशीच्या वैद्यकीय चाचण्यांना काल परवानगी दिली आहे. लस टोचून घेण्यासाठी शहरातील जवळपास 400 स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे. लसीसाठी निर्देशित केलेल्या अटींची पूर्तता करणार्‍या स्वयंसेवकांची निवड पहिल्या टप्प्यात केली जाईल. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली आहे का याची पडताळणी करण्यासाठी आरटीपीसीआर, प्रतिपिंड (अँटिबॉडी) या चाचण्या केल्या जातील. यातून 100 स्वयंसेवकांची निवड केली जाईल.

लवकरच या निवड प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, नायर रुग्णालयाने स्वयंसेवकांची निवड प्रक्रिया पूर्ण केली असली तरी सिरम इन्स्टिटयूट आणि भारतीय वैद्यक संशोधन परिषदेकडून स्वयंसेवकाचा विमा आणि इतर बाबींबाबत पत्रव्यवहार केला आहे. परंतु प्रत्युत्तर न आल्याने प्रक्रिया थांबली असल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like