Oxygen Cylinder : रेल्वेपेक्षा महामार्गावरुन अधिक लवकर मिळू शकला असता ऑक्सिजन

मुंबई : रेल्वेमार्फत विशाखापट्टणम येथून महाराष्ट्राला ७ ऑक्सिजन टँकरमार्फत सुमारे १०० ते १२५ टन ऑक्सिजन मिळणार आहे. हा ऑक्सिजन मिळायला रविवार उजाडणार आहे. या वाहतूकीत आलेल्या अडचणी पाहता रस्तामार्गे हा ऑक्सिजन कमी वेळेत महाराष्ट्रात पोहचला असता असे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

मुंबई ते विशाखापट्टणम हे अंतर सुमारे १३७० किलोमीटर आहे. कोणताही ट्रक, टँकर मुंबईहून निघाला तर विशाखापट्टणमला साधारण २७ तासात पोहचू शकतो व तेथून ऑक्सिजन भरल्यानंतर पुन्हा तेवढ्याच वेळेत तो मुंबईला परत येऊ शकला असता़ साधारण या सर्व प्रक्रियेला एका टँकरला साधारण ७० तास लागले असते.

मुंबईतील कळंबोळी येथून सोमवारी सकाळी ८ वाजता ७ टँकर घेऊन निघालेली ही ऑक्सिजन एक्सप्रेस तब्बल ५२ तासांनी विशाखापट्टणमला गुरुवारी पोहचली. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री १ वाजता ती पुन्हा मुंबईकडे रवाना झाली आहे.

का लागला इतका वेळ?
ऑक्सिजन एक्सप्रेसची घोषणा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केल्यानंतर तातडीने कळंबोली येथे रो रो ट्रॅक बांधण्यात आला. त्यानंतर मालगाडीच्या वॅगनवर हे टँकर चढविण्यात आले. तेव्हा लक्षात आले की या टँकरची उंची जास्त आहे. त्यामुळे टँकरच्या चाकांमधील हवा काढून टाकण्यात आली. त्यानंतर वाटेत असलेल्या बोगद्यांची उंची कमी असल्याने उंच असलेले टँकर त्यातून जाऊ शकणार नाही, असे लक्षात आले. त्यामुळे एरवी ग्रीन कॉरिडॉर निर्माण करुन जी मालगाडी ३५ ते ४० तासात विशाखापट्टणमला पोहचली असती तिला वळसा घालून जावे लागल्याने तब्बल ५३ तास लागले. येतानाही तेवढेच किंबहुंना अधिक तास लागण्याची शक्यता आहे.

रोडमार्गे अधिक जलद वाहतूक
या रो रो सेवेतील अडचणी लक्षात घेता रोडमार्गे ऑक्सिजनची वाहतूक केली असती तर ती अधिक लवकर झाली असती. मुंबई विशाखापट्टणम हे रोडमार्गे अंतर १३७० किमी आहे. मुंबईहून निघालेल्या या टँकरला ग्रीन कॉरिडार करुन एकाचवेळी हे ७ टँकर पाठविले असते. त्यावर आणखी दोन चालक दिले असते तर या टँकरनी सलग अंतर कापले असते. सरासरी ५० किमी वेग गृहीत धरला तरी २७ तासात ते विशाखापट्टणमला पोहचले असते. तेथे ऑक्सिजन भरल्यावर काही तासात पुन्हा प्रवासाला निघाले असते. अशा प्रकारे जवळपास ६० ते ६५ तासात हे टँकर मुंबईला आले असते. तितका वेळ या टँकरला रेल्वेना जाण्यासाठीच सध्या लागला आहे.

पश्चिम महाराष्ट्राची दररोजची ऑक्सिजनची मागणी ४०० टन इतकी आहे. त्या तुलनेत इतका गाजावाजा करुन येणार्‍या ही ऑक्सिजन एक्सप्रेसमधून केवळ १०० ते १२५ टन ऑक्सिजन येणार आहे.