गरजूंपर्यंत ऑक्सीजन सिलेंडर पोहचवण्यासाठी विकली 23 लाखांची SUV, मुंबईतील या ‘देवदूता’ने केली हजारो लोकांना मदत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण देश यावेळी कोरोना महामारीच्या गंभीर स्थितीला तोंड देत आहे. रोज शेकडो लोक औषध, बेड आणि ऑक्सीजन न मिळाल्याने जीव सोडत आहेत. कुणाला वेळेवर उपचार मिळत नाही तर कुणासाठी ऑक्सीजनची कमतरता जीवनासाठी संकट ठरत आहे. अशा स्थितीत संपूर्ण देशाला ऑक्सीजनच्या मोठ्या टंचाईचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे मुंबईच्या मालाडमध्ये राहणारा एक व्यक्ती गरजूंसाठी देवदूत ठरला आहे.

मुंबईत राहणार्‍या शाहनवाज शेख यांनी मृत्यूच्या दाढेखाली चाललेल्या लोकांना नवे जीवन देण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे, ज्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. शाहनवाज शेख एका फोन कॉलवर कोरोना रुग्णांपर्यंत ऑक्सीजन पोहचवण्याचे काम करत आहेत. लोकांच्या मदतीसाठी तैनात त्यांच्या टीमने यासाठी एक ‘कंट्रोल रूम’ सुद्धा बनवला आहे, ज्याद्वारे रूग्णांना वेळेवर ऑक्सीजन मिळावा आणि संकटाच्या काळात त्यांना दारोदार हिंडावे लागू नये. आपल्या या पवित्र कामामुळे शाहनवाज हे आता ‘ऑक्सीजन मॅन’च्या नावाने ओळखले जात आहेत.

लोकांना मदत करण्यासाठी विकली 22 लाखांची एसयुव्ही कार
शाहनवाज यांनी सांगितले की, लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी 22 लाख रुपयांची एसयुव्ही विकली. आपली फोर्ड एंडेव्हर गाडी विकल्यानंतर त्यांना जे पैसे मिळाले, त्या पैशातून शाहनवाज यांनी गरजूंसाठी 160 ऑक्सीजन सिलेंडर खरेदी करून आणले. शाहनवाज यांनी म्हटले की, मागील वर्षी लोकांची मदत करताना त्यांच्याकडील पैसे संपले, ज्यानंतर त्यांनी आपली एसयुव्ही कार विकण्याचा निर्णय घेतला.

लोकांना मदत करण्याची प्रेरणा कुणाकडून मिळाली, असे विचारले असता शहनवाज म्हणाले, मागच्या वर्षी त्यांच्या मित्राच्या पत्नीने ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे रिक्शातच प्राण सोडले होते. ज्यानंतर त्यांनी गरजूंना मदत करण्याचे आणि मुंबईत रूग्णांपर्यंत ऑक्सीजन पोहचवण्याचे काम सुरू केले.

आतापर्यंत त्यांनी 4 हजार लोकांना मदत केली आहे. ऑक्सीजनसाठी त्यांना जानेवारीत 50 फोन येत होते, सध्या 500 ते 600 फोन रोज येत आहेत. सध्या ते केवळ 10 ते 20 टक्के लोकांपर्यंत मदत पोहचवू शकत आहेत. शाहनवाज यांच्याकडे सध्या 200 ऑक्सीजन सिलेंडर आहेत. यामध्ये 40 ऑक्सीजन सिलेंडर रेंटचे आहेत. गरजू लोक येथे येऊन ऑक्सीजन घेऊ शकत नसल्याने त्यांना घरापर्यंत तो पोहचवावा लागतो.