काय सांगता ! होय, चक्क ऑक्सिजनने भरलेला टँकर बेपत्ता, पोलिस स्टेशनमध्ये तक्रार; जाणून घ्या कुठं झालाय प्रकार

हरियाणा : वृत्तसंस्था –  कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव यामुळे अनेक आरोग्य सेवांचा तुटवडा आहे. त्यात प्राणवायूचा अधिक तुटवडा असल्याने सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. यामध्येच येथील पानीपत रिफायनरीहून सिरसा येथे टँकर भरून जात असलेला प्राणवायू हा टॅंकरच गायब झाला आहे. या प्रकारावरून पानिपत येथील औषध नियंत्रण अधिकारी विजय राजे यांनी बोहली पोलीस स्टेशनमध्ये चोरी झाल्याची फिर्याद दिली आहे. यावरून आता प्रशासनाला धक्का बसला आहे.

प्राणवायूची भरलेला टँकर पानीपतहून सिरसाला रवाना झाला होता. हा टँकर इच्छित ठिकाणी पोहोचलाच नाही अशी माहिती स्टेशन हाऊस ऑफिसर मनजीत सिंग यांनी दिलीय, पानीपतहून सिरसाला पोहोचण्यासाठी साधारण तास कालावधी लागतो. परंतु, या वेळेत सिरसामध्ये टँकर न पोहोचल्याने पानीपतमध्ये कंपनीत संपर्क करण्यात आला. या प्रकरणी ड्रग कंट्रोल ऑफिसरलाही कळवण्यात आलं. टँकर चालकाचा फोनही बंद येत आहे. टँकरचा शोध सुरू आहे. टँकर चालकाचे शेवटचे ठिकाण चेक केले जात आहे. मोबाइलचे कॉल डिटेल्स काढले जात आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

या प्रकरणावरून पानीपतसह सिरसाचे पोलिसही टँकरचा शोध घेत घेत आहेत. टँकरवर पंजाबचा क्रमांक असून चालकही बेपत्ता आहे. पानीपत रिफायनरीमध्ये Air Liquid North India Pvt. Ltd. कंपनी ऑक्सिजनचा पुरवठा करते. या कंपनीतून बुधवारी रात्री १ प्राणवायू (Oxygen) टँकर सिरसाला रवाना करण्यात आला होता. या टँकरमध्ये ८ टन ऑक्सिजन आहे. याची किंमत सुमारे १ लाख १० हजार रुपये आहे. या दरम्यान, दुसर्‍या घटनेत हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी असा आरोप केला होता की, पानिपतहून फरीदाबादकडे रूग्णालयांतील कोरोना रूग्णांसाठी वैद्यकीय प्राणवायू घेऊन जाणारे टँकर दिल्ली सरकारकडून त्यांच्या सीमेवर लुटले होते. असे ते म्हणाले होते.