पाडाळे धरण : 162 शेतकऱ्यांचे मोबदल्यासाठी हेलपाटे, आंदोलनाचा इशारा

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन (अरुण ठाकरे) – सरळगाव परीसरातील आठ ते दहा गावे सिंचनाखाली आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाने भामखोर नदीवर पाडाळे येथे धरणाचे बांधकाम केले. प्रथम 1983 /84 ला मान्यता मिळालेल्या या धरणाचा अंदाजपत्रकीय खर्च फक्त 172.14 लक्ष होता. त्यानंतर 2002/03 मध्ये खर्चात आणखी वाढ करण्यात येऊन हा आकडा 1321.21 लक्ष करण्यात आला.

चार वर्षांत म्हणजेच 2007/08 मध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आणि हा आकडा मुळ अंदाजपत्रकाच्या काही पट वाढवून तब्बल 4347.37 लक्ष करण्यात आला. यात आणखी दोन वर्षांनी 80 कोटी 71 लाख रुपयांची वाढ करण्यात आली. ही वाढ करण्यासाठी ठेकेदारांनी शासनाला निरनिराळी कारणे सांगितली आणि आधिका-यांनी ठेकेदारांनी दिलेली कारणे ग्राह्य धरून ठेकेदाराला मालामाल केले. मात्र, ज्या शेतक-यांच्या जमिनी धरणासाठी अधिग्रहीत केल्या त्यांना मात्र मोबदला मिळावा म्हणून शासन दरबारी हेलपाटे मारण्याचे काम लाऊन दिले. मागील वर्षी शेतक-यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांना भरपाई देण्याचे कबूल केले. परंतू गेंड्याच्या कातडीची प्रशासकीय यंत्रणा मुरबाड मध्ये धर्मा पाटील होणार याची वाट पाहात आहे का असा सवाल करीत पुन्हा या वंचित शेतक-यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सरळगाव परीसरातील पाडाळे, ठुणे, माजगाव, मानीवली, कान्हार्ले, कळंभे, तळवली, नांदगाव या आठ गावांना पूर्णत: व नागांव, पारतळे, सरळगाव, नेवाळपाडा या गावांना अंशत: सींचनाचा फायदा होण्याच्या हेतूने 1983/84 चे सुमारास पाडाळे येथे भामखोर नदीवर पाटबंधारे विभागाने धरण मंजूर केले. या धरणासाठी वनजमीन व खाजगी जमीन अधिग्रहीत करण्यात आली. बुडीत क्षेत्रातील शेतक-यांना शासनाने मोबदला दिला. मात्र कालव्यासाठी संपादीत केलेली जमीन शेतक-यांना तोंडी अश्वासन देऊन कालव्याचे काम पूर्ण केले. परंतू पाटबंधारे विभागाने अथवा ठेकेदारांनी त्यांना भरपाई दिली नाही. त्यामुळे बाधीत गावातील शेतकरी संतप्त झाले असून गेल्या तीन वर्षांपासून सतत अर्ज विनंत्या, उपोषण, अंदोलन करुन थकले. परंतू भरपाई मिळत नाही.

या 162 शेतक-यांना न्याय मिळावा म्हणून कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी पुढाकार घेतला होता. मात्र त्यांनीही शेतक-यांची निराशा केल्याचा आरोप होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बाधीत शेतकरी मोबदला मिळावा म्हणून संघर्ष करीत आहेत. परंतू आश्वासना पलीकडे त्यांच्या पदरात काही पडलेल नाही.

मागील वर्षी तहसिल कार्यालयासमोर अमरण उपोषण अंदोलन केल्यानंतर आमदार किसन कथोरे यांनी मध्यस्थी करून उपोषण अंदोलन थांबवले व पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी असे पाटबंधारे विभागाला आदेश वजा इशारा दिला. परंतू आमदारांच्या आदेशाची देखील या विभागाने पायमल्ली केली. व आजपर्यंत पाडाळे धरणातील कालव्यात बाधीत शेतक-यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळत नसल्याने धर्मा पाटील या वयोवृद्ध शेतक-यांनी स्वीकारलेल्या मार्गाने शासन शेतक-यांना ढकलीत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त शेतकरी व काँग्रेस चे तालुका चिटणीस गुरुनाथ पष्टे यांनी केला आहे असून आंदोलन करण्याचा इशारा तहसिलादारांना दिला आहे. तर पाटबंधारे विभागाकडे चौकशी केली की 11 कोटी रुपये मंजूर असून खाजगी वाटाघाटी द्वारे हा प्रश्न सोडवला जाईल हे कायमचे ठरलेले उत्तर दिले जाते.

…तर आत्महत्या करावी लागेल

शासनाच्या वतीने पाटबंधारे विभागाचे अधिकारी व मुरबाडचे तत्कालीन तहसिलदार यांनी दोन वर्षापुर्वी 162 शेतक-यांना कालव्यासाठी संपादीत केलेल्या जमीनीचा मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते. परंतू आज पर्यंत कोणतीच कार्यवाही न झाल्याने आम्ही वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रकल्पग्रस्त शेतकरी व काँग्रेस तालुका चिटणीस गुरुनाथ पष्टे म्हणाले.

पाडाळे धरणाचे कालव्यासाठी संपादीत केलेल्या 162 शेतक-यांचा प्रश्न खाजगी वाटाघाटीने सोडवला जाईल. यासाठी 11 कोटी रुपये मंजूर असून लवकरच हा प्रश्न सोडवला जाईल. असे पाडाळे धरणाचे  उपविभागीय अभियंता गवई यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like