Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळं 3 एप्रिलला होणारा पद्म पुरस्कार समारंभ स्थगित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे 3 एप्रिलला होणारा पद्म पुरस्कार समारंभ स्थगित करण्यात आला आहे. गृह मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले की पद्म पुरस्कारासाठी 3 एप्रिलला राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार समारंभ निश्चीत केला गेला होता, परंतु खबरदारी म्हणून हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. यात एकूण 21 जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. यातील 3 दिग्गज हे महाराष्ट्रातील आहेत. ज्यात गायक सुरेश वाडकर, राहीबाई पोपेरे आणि पोपटराव पवार यांचा समावेश आहे.

जगदीश लाल आहूजा, मोहम्मद शरीफ, जावेद अहमद टाक, तुलसी गोडा, सत्यनारायण मुंदयूर, अब्दुल जब्बार, उषा चौमार, पोपटराव पवार, हरेकाला हजब्बा, अरुणोदय मंडल, राधामोहन आणि साबरमती, कुशल कोनवार शर्मा, त्रिनिती सावो, रविकन्नन, एस रामकृष्णन, सुंदरम वर्मा, मुन्ना मास्टर, योगी आर्यन, राहीबाई सोमा पोपेरा, हिम्मत राम भांभू, मोझ्झिकल पंकजाक्षी या 21 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

25 जानेवारीला सरकारकडून पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मभूषण असे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्याचे वितरण 3 एप्रिलला होणार होते. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रसाराने हा पुरस्कार वितरण सोहळा स्थगित करण्यात आला आहे.